प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे
स्थानकांवर मेटल डिटेक्टर डोअर, बॅग स्कॅनिंग मशीन सुविधा नाहीत
बेलापूर, ता. १ (बातमीदार) ः नवी मुंबई स्मार्ट शहरात कोट्यवधी खर्चून प्रशस्त रेल्वे स्थानके उभारली आहेत; मात्र ही स्थानके प्रवाशांसाठी गैरसोयीची ठरत असतानाच त्यांच्या सुरक्षेबाबतही कोणतीही ठोस यंत्रणा अस्तित्वातच नसल्याचे समोर आले आहे. दहशतवादी कारवाया किंवा एखादी आणीबाणी टाळण्यासाठी आवश्यक असणारे मेटल डिटेक्टर डोअर, बॅग स्कॅनिंग मशीन यांसारख्या प्राथमिक सुविधा स्थानकांच्या प्रवेशद्वारावर गायब आहेत. त्यातच रेल्वे पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची सुरक्षा पूर्णपणे वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
सिडकोने नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची उभारणी केली असून याची देखभाल व डागडुजी करणे तसेच स्थानकांवर नवीन सुविधा उपलब्ध करणे या जबाबदाऱ्यादेखील सिडको प्रशासनाच्या आहेत; मात्र असे असताना वाशीपासून पुढे बेलापूर स्थानकापर्यंत सुविधांची वानवा दिसून येते. हजारो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करीत असताना प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. मधल्या काळात रेल्वे स्थानकात हत्यार घेऊन काही प्रवाशांना घाबरवण्याच्या घटना ताज्या असताना अद्याप स्थानकाच्या प्रवेशद्वारावर कोणत्याही सुरक्षा उपाययोजना रेल्वे पोलिस, रेल्वे प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या नाहीत. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर डोअर नाहीत, कोणत्याही प्रकारची बॅग स्कॅनिंग मशीन नाही. परिणामी, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रेल्वे पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ
स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिस तत्पर असणे आवश्यक आहे; मात्र नवी मुंबई शहरातील विविध रेल्वे स्थानकावर पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे ठरत आहे. दरम्यान, याबाबत वाशी, बेलापूर लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला असता कोणताही संपर्क होऊ शकला नाही.
अद्याप मेटल डिटेक्टर डोअरची आवश्यकता भासली नाही. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांशी समन्वय साधत आहोत. प्रवाशांची सुरक्षा अग्रस्थानी ठेवत उपाययोजना राबविण्यात येतील.
- रवींद्र कुमार रवी, स्थानक प्रबंधक, वाशी रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानकात कोणतीही सुरक्षा नाही. गर्दुल्ले सर्वत्र वाढले आहेत. फेरीवाल्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. आम्ही प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. रेल्वे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सुरळीत करून कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
- मीनाक्षी कोठारे, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.