बेपत्ता महिलेचा मृतदेह
उद्वाहनाच्या डक्टमध्ये आढळला
भिवंडी, ता. १ (वार्ताहर) : भिवंडी शहरात बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह मंगळवारी (ता. १) इमारतीच्या उद्वाहनाच्या डक्टमध्ये आढळून आला. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून या महिलेचा शोध घेतल्याने उद्वाहनाच्या डक्टमध्ये महिला पडल्याचे आढळून आले. शाहीन मोहम्मद सुलतान शेख (वय ५४, रा. हाजी सुलेमान अपार्टमेंट, धोबी तलाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोबी तलाव परिसरातील अल मोईन रुग्णालयाजवळ शाहीन मोहम्मद सुलतान शेख राहत होत्या. त्या सोमवारी सायंकाळी आपल्या बहिणीकडे गेल्या होत्या. रात्री साडेनऊ वाजता त्या घरी येण्यासाठी निघाल्या, परंतु त्या घरी पोहोचल्या नाही. कुटुंबीयांनी त्या घरी न आल्याने त्यांचा परिसरात शोध घेतला तसेच सकाळी भोईवाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी महिलेच्या मोबाईल नेटवर्कचा तांत्रिक तपास सुरू केला असता, तो त्याच राबिया अपार्टमेंट इमारत परिसरात दाखवत होते. यामुळे पोलिसांनी त्याच परिसरात शोध घेतला. त्या वेळी महिलेचा मृतदेह इमारतीच्या उद्वाहनाच्या डक्टमध्ये आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून, अपघाती मृत्यूची नोंद करून गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.