म्हाडाच्या पुणे मंडळाकडून ६३४ घरांची यशस्वी सोडत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे पुणे ताथवडे येथील टप्पा-२ अंतर्गत ६३४ सदनिकांची आज संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यामुळे घराच्या प्रतीक्षेत असलेल्यांचे गृहस्वप्न पूर्ण झाले. गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीद्वारे सोडत काढण्यात आली.
म्हाडाच्या पुणे मंडळाने गेल्या दोन-तीन वर्षांत नवनवीन प्रकल्प हातात घेत हजारो अर्जदारांची गृहस्वप्नपूर्ती केल्याचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर या वेळी म्हणाले. ताथवडे परिसरातील योजना पुणे महानगर परिसरात गुणवत्तापूर्ण, नियोजनबद्ध आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या म्हाडाच्या प्रयत्नांना बळकटी देणारी आहे. या योजनेमध्ये चारचाकी वाहनाकरिता प्रतिसदनिका एक वाहनतळ देण्यात आले आहे. त्याचबरोबर रहिवाशांकरिता स्वीमिंग पूल, क्लब हाऊस, इनडोअर गेम्स क्षेत्र, मुलांसाठी सुसज्ज खेळण्याची जागा, ओपन जिम, सौरऊर्जेवर आधारित ऑन-ग्रिड सोलर प्रणाली, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टिंग यांसह आधुनिक व पर्यावरणपूरक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याद्वारे गृहनिर्माण प्रकल्पात व्यावसायिक पद्धतीच्या सुविधा देण्याचा म्हाडाचा स्तुत्य प्रयत्न आहे. याच प्रकल्पात व्यावसायिक दुकाने उभारण्याचे काम सुरू असून भविष्यात त्यांच्या विक्रीविषयी नियोजन सुरू असल्याचे डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. भविष्यातदेखील अधिक दर्जेदार, परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील असल्याचे डॉ. भोयर यांनी सांगितले. या वेळी पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.