पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोषत्वाला आव्हान
पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : काँग्रेस नेते पवन राजेनिंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या दोन दशकांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (वय ८६) यांच्यासह अन्य आरोपींची निर्दोष सुटका केली होती. त्या निर्णयाला राजेनिंबाळकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने त्यांच्या अपिलाची दखल घेऊन पाटील आणि इतर आरोपींना नोटीस बजावली आहे.
प्रकरणातील मूळ तक्रारदार आणि शिवसेनेचे धाराशिव येथील खासदार ओम राजेनिंबाळकरांच्या आई आनंदीदेवी यांनी पाटील यांच्या निर्दोषत्वाला आव्हान दिले असून अपिलावर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी (ता. १) सुनावणी झाली. तेव्हा सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
पाटील आणि पवनराजे हे राजकीय प्रतिस्पर्धी होते हे सिद्ध झाले आहे, त्यांनी एकमेकांविरुद्ध विविध तक्रारी आणि प्रतितक्रारी दाखल केल्या होत्या. असे असले तरी पाटील हे या हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार होते हे सिद्ध करण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे, अशी टिप्पणी करून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी निकालात नमूद केले होते. तपास यंत्रणेने सादर केलेला बहुतांश पुरावा अमान्य केला होता. माफीचा साक्षीदार झालेल्या पारसमल जैनची साक्ष खटल्यात महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती; परंतु ताब्यात घेतल्यानंतर जैनला १५ दिवस बेकायदा कोठडीत ठेवून त्यांचा छळ करण्यात आला होता. त्यामुळे ती संशयास्पद असून त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असेही निकालपत्रात अधोरेखित करून विशेष न्यायालयाने पद्मसिंह पाटील यांच्यासह सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलास यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे यांचीही संशयाचा फायदा देऊन निर्दोष सुटका केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.