ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस जाहीर
१८१ कोटींच्या ढोबळ नफा; ५७ कोटी निव्वळ नफ्यासह आर्थिक क्षेत्रात दमदार घोडदौड
ठाणे, ता. २ ः ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय आर्थिक कामगिरी करीत सहकार क्षेत्रातील आपले अव्वल स्थान पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या वित्तीय अहवालानुसार बँकेला तब्बल १८१ कोटी रुपयांचा ढोबळ नफा आणि ५७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद साजरा करीत बँकेच्या संचालक मंडळाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कमाल मर्यादेचा म्हणजेच २० टक्के बोनस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कर्मचारीवर्गात उत्साहाचे वातावरण असून, बँकेच्या यशात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सहकारी बँकिंग क्षेत्रात कर्मचारी कल्याण आणि त्यांच्या हक्कांना प्राधान्य देणारी बँक म्हणून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे पाहिले जाते. यंदाही बँकेने नफ्यातील यशाचा लाभ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवत २० टक्के बोनस जाहीर केला आहे. बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष अरुण पाटील यांनी यासंदर्भात बोलताना अधिक माहिती दिली.
बँकेने केवळ नफ्यात वाढ केली नसून आपल्या व्यवसायाचा विस्तारही मोठ्या प्रमाणावर केला आहे. बँकेची एकूण उलाढाल १६ हजार १४३ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. संचालक मंडळाचे चोख व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि ग्राहकांचा बँकेवर असलेला अढळ विश्वास या त्रिसूत्रीमुळे बँकेला हे यश मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आगामी काळात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर वाढवून ग्राहकांना आधुनिक डिजिटल सेवा देण्यासोबतच बँकेची आर्थिक घोडदौड अशीच सुरू ठेवण्याचा मानस बँक प्रशासनाने व्यक्त केला आहे.
शहरी, ग्रामीण भागात विस्तार
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात ११७ शाखांच्या माध्यमातून बँक ग्राहकांना सेवा देत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यात बँकेचे मोठे योगदान राहिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.