वंशिका चाचे : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील बाजारपेठांमध्ये मातीच्या मडक्यांची मोठी धूम पाहायला मिळत आहे. पारंपरिक मोठ्या हंड्यांसह आकर्षक डिझाइन केलेली मडकी आणि घरगुती सजावटीसाठी वापरली जाणारी छोटी रंगीत मडकी यंदा ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. ठाण्यातून मुंबई, भाईंदरसह विविध भागांत मडक्यांचा पुरवठा केला जात असून आतापर्यंत सुमारे अडीच हजार मडक्यांची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
गोकुळाष्टमीच्या हंगामासाठी सहा महिने आधीपासून मडकी तयार करण्यास सुरुवात करण्यात आली होती. विविध रंग, आकर्षक नक्षीकाम आणि पारंपरिक कलाकुसरीमुळे डिझाइनर मडक्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाइज मडकी तयार करून देण्याची मागणी यंदा वाढली आहे. अशा मडक्यांसाठी एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंत खर्च केला जात असून, विशेष डिझाइन असलेल्या मडक्यांसाठी ग्राहकांकडून मोठी मागणी होत आहे. एका मडक्यावर डिझाइन आणि सजावट करण्यासाठी सुमारे ३०० ते ५०० रुपये खर्च येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
छोट्या मटक्यांनाही ‘कस्टमाइज’ मागणी
टेंभी नाका, जांभळी नाका परिसरासह विविध ठिकाणच्या आयोजकांकडून मडक्यांची मागणी येत आहे. तसेच विविध राजकीय पुढारी आणि सार्वजनिक मंडळांकडूनही खास डिझाइनच्या मडक्यांसाठी मागणी केली जात आहेत. गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर घरगुती सजावट, बाळकृष्णाच्या देखाव्यांसह सार्वजनिक दहीहंडी उत्सवासाठी मडक्यांची खरेदी वाढल्याने ठाणे बाजारपेठ सध्या मडक्यांच्या रंगतदार दुनियेत सजली आहे.
डिझाइन केलेली मोठी मडकी - १५० ते ८००
डिझाइन केलेली छोटी मडकी - ८० ते १००
साधे छोटे मटके - ३० ते ५०
साधे मोठे मटके - ८० ते २५०
कस्टमाइज मडक्यांचा खर्च- १,००० ते १,२००
गोकुळाष्टमीसाठी आम्ही सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. यंदा मोठ्या मडक्यांसोबत छोट्या डिझाइनर मटक्यांनाही चांगली मागणी आहे. आतापर्यंत अडीच हजार मडक्यांची विक्री झाली असून ठाणे, मुंबई आणि भाईंदरपर्यंत मडकी पाठवली जात आहेत. कस्टमाइज मडक्यांची मागणी विशेष वाढली आहे, मात्र पेट्रोल आणि महागाईमुळे खर्च वाढल्याने भावात सुमारे २० रुपयांची वाढ झाली आहे.
- मिनू सुरेंद्र शाहा, विक्रेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.