‘अजित पवारांना न्याय कधी मिळणार?’
खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर झालेल्या तातडीच्या एफआयआरचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावरून राज्य सरकारला धारेवर धरले. एका प्रकरणात अवघ्या तासाभरात गुन्हा दाखल होतो. मग अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही, असा सवाल सुळे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत केला.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या घटनेच्या तपासाची दिशा काय आहे, त्यात नेमके काय समोर आले याबाबतची माहिती आम्हाला अद्याप मिळत नाही. आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष आम्ही गमावला आहे. त्यांना न्याय मिळणार कधी, अशी विचारणा करीत सुळे यांनी भावना व्यक्त केली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष सध्या सत्तेत सहभागी असूनही त्यांच्या पक्षातील मंत्री आणि आमदार या प्रकरणावर ठामपणे बोलत नसल्याची टीकाही त्यांनी केली. ‘भाऊ आमचा गेला आणि सत्ता मात्र ते उपभोगत आहेत,’ असा टोला सुळे यांनी लगावला. या वेळी आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात मोठमोठे प्रकल्प उभारण्यावर सरकारचा भर आहे. मात्र नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सुळे यांनी सांगितले. कोल्हापूरमधील शक्तिपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध असतानाही सरकार प्रकल्प पुढे रेटत असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील विद्यमान रस्त्यांची दुरवस्था हा गंभीर प्रश्न असल्याचे सांगताना त्यांनी रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, हेच कळत नाही, अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था आणि जीडीपीची आकडेवारी याबाबत सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रचार केला जात असला, तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा सामान्य कुटुंबांना किती होत आहे, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.
……………..,..
ठाण्यात मेट्रोपेक्षा बससेवेला प्राधान्य द्या
ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही सुळे यांनी भाष्य केले. ठाणेकरांना केवळ मोठे प्रकल्प नकोत, तर दैनंदिन प्रवासासाठी सक्षम आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे. ठाणेकरांना चांगली मेट्रो सेवा मिळावी याला विरोध नाही; मात्र उत्तम बससेवाही तितकीच महत्त्वाची आहे. सरकारने मोठ्या खर्चाचे प्रकल्प करण्यापेक्षा नागरिकांच्या रोजच्या गरजांकडेही लक्ष द्यावे, असे सुळे म्हणाल्या.
…………….
महाराष्ट्रातच पेपरफुटी कशी होते?
पेपरफुटीच्या घटनांवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षा वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडत असतील, तर त्यामागची कारणे शोधणे आवश्यक असल्याचे सांगत आपल्याच महाराष्ट्रात पेपर कसे फुटतात, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
………….
राष्ट्रवादीच्या प्रकरणात ‘तारीख पे तारीख’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेवरही सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अनेकदा अर्ज करूनही अपेक्षित प्रगती होत नसल्याचे त्या म्हणाल्या. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे; मात्र आमच्या पदरात केवळ तारीख पे तारीख येत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
…………….
भागवत यांच्या वक्तव्यावर मिश्कील प्रतिक्रिया
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलीकडील वक्तव्याबाबत विचारले असता सुळे यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. ‘जर काँग्रेससारखी भागवत यांची विचारधारा होत असेल, तर आनंदच आहे,’ असे त्या म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.