३० लाखांहून अधिक नावे वगळली
मुंबईच्या मतदार यादीचे ‘क्लिनिंग’ : एस. चोक्कलिंगम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ‘मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ अंतर्गत मुंबईतील मूळ एक कोटी मतदारांपैकी सुमारे ३० लाखांहून अधिक मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आली असून ही ‘क्लिनिंग’ प्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बुधवारी (ता. २) दिली. एकही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाणार नाही आणि एकाही अपात्र व्यक्तीचा मतदार यादीत समावेश होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे कडक निर्देश चोक्कलिंगम यांनी निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण शिबिरात दिले.
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ कार्यक्रमांतर्गत महापालिका क्षेत्रातील निवडणूक नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले, की
‘मुंबईतील एक कोटी मतदारसंख्येतून मृत अथवा स्थलांतरित सुमारे ३० लाखांहून अधिक मतदारांची नावे कमी झाली आहेत. ही प्रत्यक्ष ‘क्लिनिंग’ प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.’ पुढे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश देताना म्हणाले, की ‘मृत अथवा इतरत्र स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ भरून घेताना संबंधित माहितीची खात्री करून घ्यावी, फॉर्म क्रमांक ७ मध्ये कोणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार द्यावी. तसेच, २४ ऑक्टोबर २०२४ नंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करून नमुना क्रमांक ६ भरून घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’
कागदपत्रांच्या आधारेच निर्णय घ्यावा!
‘मतदारांचे रहिवासी पुरावे पहिल्या टप्प्यात तपासण्यात आले आहेत, त्यामुळे आता केवळ नागरिकत्व आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी, अर्जांची छाननी करताना उपलब्ध कागदपत्रांच्या आधारेच निर्णय घ्यावा, या मोहिमेदरम्यान चौकशीच्या नावाखाली नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी,’ असेही चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.