भिवंडी, ता. ३ (वार्ताहर) : भिवंडीत यंदाच्या दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार असून विविध मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. कपिल पाटील फाउंडेशनच्या वतीने गोविंदा पथकांची सुरक्षितता लक्षात घेऊन विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुमित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फाउंडेशनचे सदस्य तथा प्रभाग समिती सभापती ॲड. वैभव भोईर उपस्थित होते.
फाउंडेशनच्या माध्यमातून समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान आणि किरण देशमुख मित्र मंडळ यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात दहीहंडी उत्सव होणार आहे. यंदा या उत्सवाचे १९वे वर्ष आहे. गतवर्षी लहान-मोठ्या १४८ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. यंदा आठ व नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी दोन सुरक्षा पट्टेही उपलब्ध असतील. महिला गोविंदा पथकांची संख्या वाढल्याने त्यांच्यासाठी; तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या आदिवासी गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र चषक व बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या वर्षीचे मुख्य पारितोषिक दोन लाख ८३ हजार रुपये असून, पाच, सहा, सात आणि आठ थरांसाठी अनुक्रमे पाच हजार, सात हजार, १० हजार आणि ५० हजार रुपये अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी दोन रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात येणार असल्याचे ॲड. वैभव भोईर यांनी सांगितले.
विविध ठिकाणी उत्सव
धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली स्व. आनंद दिघे चौकात, तर माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भादवड चौकात दहीहंडी होणार आहे. राजनवली नाका येथे ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख करसन ठाकरे यांच्या माउली ग्रुपतर्फे, भंडारी चौक, नारपोली येथे नगरसेवक यशवंत टावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवशक्ती मित्र मंडळातर्फे, अंजूरफाटा येथे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली राज मित्र मंडळातर्फे, तर बापगाव येथे दयानंद चोरघे यांच्या डी. वाय. फाउंडेशनतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.