ऐरोलीतील संशयित ठेकेदाराची चौकशी करा
नवी मुंबई पालिकेत गटनेते मनोज हळदणकर आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत शिवसेनेचे गटनेते मनोज हळदणकर यांनी ऐरोली परिसरातील नागरिकांच्या समस्यांवरून पालिका प्रशासनाला धारेवर धरले. ऐरोलीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भारत बिजली नाला बंदिस्त करून सर्व्हिस रोड उभारणे, पाच वर्षांपासून सहा एमएलडी पाण्याच्या टाकीचे काम रखडवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे आणि सेक्टर ३ व १९-२० ला जोडणारा रस्ता विकसित करणे, अशा तीन महत्त्वाच्या ठरावांद्वारे हळदणकर यांनी महासभेत नागरिकांचे प्रश्न मांडले.
सभागृहात बोलताना मनोज हळदणकर म्हणाले, की भारत बिजली अंडरपास ते ऐरोली टी-जंक्शनपर्यंत जाणारा नाला बंदिस्त करून त्यावर सर्व्हिस रोड विकसित करण्याची तातडीची गरज आहे. एलिव्हेटेड रोडला जोडणारा रस्ता विकसित केल्यामुळे पूर्वीच्या तीन मार्गिका (लेन्स) आता दोन मार्गिकांवर आल्या आहेत. यामुळे ऐरोलीत प्रवेश करताना मोठा बॉटलनेक निर्माण होऊन तीव्र वाहतूक कोंडी होत आहे. हा नाला बंदिस्त करून त्यावर सर्व्हिस रोड तयार केल्यास भारत बिजलीमार्गे ऐरोलीत प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना सिग्नलवर थांबण्याची गरज भासणार नाही आणि ते थेट शहरात प्रवेश करू शकतील. यामुळे ऐरोलीतील वाहतूक कोंडी कायमची फुटण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांपासून (कोविड काळापासून) ऐरोलीत सहा एमएलडी क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्याचे काम मेसर्स माधवराव फड या एजन्सीच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि संथ गतीने सुरू असूनही संबंधित ठेकेदारावर पालिका अधिकारी का मेहेरबान आहेत, असा सवाल हळदणकर यांनी केला. कामाच्या मूल्यापेक्षा जास्त देयके या ठेकेदाराला दिली गेली आहेत आणि मुदत संपूनही त्याला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. अशातच आता या ठेकेदाराला शेजारील गोबर गॅसच्या पाण्याच्या टाकीचे काम देण्याच्या हालचाली सुरू असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
---------------------------------------
हळदणकर यांची आक्रमक मागणी
या कामाची आणि ठेकेदाराची तात्काळ निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. तक्रारदार म्हणून मला स्वतःला या चौकशीत बोलावून माझे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात यावी. जनतेच्या पैशांची होणारी लूट थांबवून या ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे आणि उर्वरित काम दुसऱ्या एजन्सीला द्यावे, अशी मनोज हळदणकर यांनी मागणी केली. ऐरोली सेक्टर ३ आणि सेक्टर १९-२० ला जोडण्यासाठी सध्या कोणताही थेट रस्ता उपलब्ध नाही. या दोन्ही क्षेत्रांदरम्यान असणारा केवळ ३०० मीटरचा नाला बंदिस्त केल्यास नागरिकांना थेट जोड रस्ता उपलब्ध होऊ शकतो. हा ३०० मीटरचा नाला बंदिस्त झाल्यास नागरिकांचे एक किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. यामुळे स्थानिक रहिवासी वाहनांऐवजी थेट चालत ऐरोली रेल्वे स्थानकापर्यंत सहज पोहोचू शकतील. जनतेच्या हिताचा विचार करून या प्रस्तावाला प्रशासनाने तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी आग्रही मागणी मनोज हळदणकर यांनी महापौर सुजाता पाटील यांच्याकडे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.