महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून पाणीचोरी
नगरसेवक अभिजित देसाई यांचा महासभेत घणाघात
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : नेरूळ-शिरवणे परिसरातील पाणीटंचाई, रखडलेला जलकुंभ आणि शिरवणे सेक्टर २३ मधील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून नगरसेवक अभिजित देसाई यांनी नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. पारसिक हिलवरून येणाऱ्या पालिकेच्या मुख्य ८०० मिमी जलवाहिनीवरून डी. वाय. पाटील संस्थेने बेकायदा दोन जोडण्या घेऊन लाखो लिटर पाण्याची चोरी केल्याचा खळबळजनक आरोप करीत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देसाई यांनी केली. येत्या महासभेपर्यंत कारवाई न झाल्यास सभागृहात आंदोलन करण्याचा सडेतोड इशाराही त्यांनी दिला.
महासभेत बोलताना नगरसेवक अभिजित देसाई यांनी पाणीचोरीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. पारसिक हिलवरून येणाऱ्या ८०० मिमीच्या मुख्य जलवाहिनीवरून नियमबाह्य पद्धतीने डी. वाय. पाटील संस्थेने दोन मोठ्या जोडण्या घेतल्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कायद्यानुसार मुख्य जलवाहिनीवरून कोणतीही खासगी संस्था किंवा कंपनी थेट पाणी जोडणी घेऊ शकत नाही. एकीकडे आमचे नागरिक पाण्यासाठी त्रस्त असताना दुसरीकडे अशी उघड पाणीचोरी सुरू आहे. या बेकायदा प्रकाराला जबाबदार असणारे अधिकारी कोण आहेत आणि त्यांना पाठीशी कोण घालत आहे, याबाबत तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. नेरूळ-शिरवणे परिसरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नवीन जलकुंभ उभारणीचा ठराव क्रमांक २६५ मांडताना देसाई म्हणाले, की २०२० मध्ये पाण्याच्या टाकीचे काम सुरू असताना तिथे भुयार आढळल्याने काम थांबले होते. या कामासाठी महापालिकेने टाटा कन्सल्टन्सीला सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे, परंतु त्यांना या ठिकाणी भेट द्यायला आणि डिझाइन पूर्ण करायला वेळच मिळत नाही. टाटा कन्सल्टन्सीला वेळ नसेल तर प्रशासनाने तात्काळ नवीन कन्सल्टंट नियुक्त करावा. पाणीटंचाईमुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत, असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीवर तीव्र संताप व्यक्त केला. सिडकोने उभारलेल्या दाटीवाटीच्या गृहनिर्माण प्रकल्पांचा पाणीपुरवठाही याच प्रस्तावित टाकीवरून होणार असल्याने राजकीय मतभेद बाजूला ठेवून या ठरावाला तातडीने मंजुरी द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
--------------------------------------
शिरवणे सेक्टर २३ ट्री बेल्ट परिसरात गाड्यांची तोडफोड
शिरवणे सेक्टर २३ मधील ‘ट्री बेल्ट’ परिसराकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप अभिजित देसाई यांनी केला. गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात अनधिकृत कामे सुरू असून, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अज्ञातांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्यांची तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर एका संशयिताला अटक करण्यात आली असली तरी प्रशासनाने या परिसराचे सुशोभीकरण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कामे हाती घ्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
-----------------------------------------
पुढील महासभेत ठिय्या आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत नगरसेवक अभिजित देसाई म्हणाले, की जर पाणीचोरी करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही आणि रखडलेल्या जलकुंभाचा प्रश्न सुटला नाही, तर पुढील महासभेत नगरसेविका माधुरी सुतार यांच्यासोबत सभागृहात अध्यक्षांच्या आसनाजवळ खाली बसून तीव्र ठिय्या आंदोलन छेडले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.