सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जल्लोषाला शिस्त आणि सुरक्षेची किनार देण्यासाठी ठाणे पोलिसांनीही ‘दहीहंडी प्लॅन’ आखला आहे. ३४ मानाच्या आणि मोठ्या दहीहंड्यांवर विशेष लक्ष ठेवतानाच ड्रोनची तीक्ष्ण नजर राहणार आहे. याशिवाय १० पोलिस उपायुक्तांसह तीन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा रस्त्यावर उतरणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी शुक्रवारी (ता. ४), तर गोपाळकाला-दहीहंडीचा उत्सव शनिवारी (ता. ५) साजरा होणार आहे. ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या पाचही परिमंडळांत उत्सवाची मोठी तयारी सुरू असून, २५३ सार्वजनिक आणि १,१०४ खासगी अशा एकूण १,३५७ ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीचे आयोजन होणार आहे. याशिवाय १५७ गोविंदा पथकांच्या मिरवणुका निघणार असल्याने पोलिसांसमोर गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेचे आव्हान असणार आहे. दरम्यान, दहीहंडीच्या मिरवणुकांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रमुख चौक, मिरवणूक मार्ग आणि गर्दीची ठिकाणे येथे विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
कल्याणचा ‘दहीहंडी स्कोअर’ सर्वाधिक
मोठी गर्दी खेचणाऱ्या मानाच्या दहीहंड्यांमध्ये कल्याण परिमंडळ आघाडीवर आहे. येथे तब्बल ११ मोठ्या हंड्या होणार आहेत. वागळे इस्टेटमध्ये आठ, भिवंडीत सहा, उल्हासनगरमध्ये पाच, तर ठाणे परिमंडळात चार मानाच्या दहीहंड्यांचा समावेश आहे. या ३४ ठिकाणी गर्दीचा अंदाज घेऊन अतिरिक्त बंदोबस्ताचे नियोजन आहे.
२९ उपायुक्तांसह सहाय्यक पोलिस आयुक्तांची नजर
उत्सवाच्या बंदोबस्तासाठी १० पोलिस उपायुक्त, १९ सहाय्यक आयुक्त, १०१ निरीक्षक आणि २९८ सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक तैनात असतील. त्यांच्यासोबत २६ महिला अधिकारी, २,३०४ पुरुष आणि ५३० महिला अंमलदार बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळतील.
होमगार्डपासून एसआरपीएफपर्यंत ‘बॅकअप’
पोलिसांना मदतीला ८०० पुरुष आणि २०० महिला होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. परिस्थिती गंभीर झाल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी एसआरपीएफच्या दोन कंपन्या आणि आरसीपीच्या दोन प्लाटून सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
परिमंडळनिहाय दहीहंडीचा ‘थर’
परिमंडळ सार्वजनिक खासगी पथक मिरवणुका मानाच्या दहीहंड्या
ठाणे ५५ २७४ २३ ४
भिवंडी ४३ २०७ २९ ६
कल्याण १९६ २८१ ४३ ११
उल्हासनगर ५१ १७६ २५ ५
वागळे इस्टेट ४८ १६६ ३७ ८
एकूण २५३ १,१०४ १५७ ३४
दहीहंडी उत्सवासाठी महत्त्वाचे नाके, चौक आणि गर्दीच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ड्रोनद्वारेही आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी संशयास्पद वस्तू आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. आयोजकांसह गोविंदा पथकांनी सुरक्षा नियमांचे पालन करावे.
- डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, सह पोलिस आयुक्त, ठाणे शहर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.