नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुविधांचा विस्तार
‘एसटी’च्या लक्झरी बससह प्रवाशांसाठी विविध पर्याय
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी विविध नवीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. विमानतळावर प्रवाशांना असुविधांमुळे होत असलेल्या त्रासाबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची दखल घेत विमानतळ प्रशासनाने स्थानिक सार्वजनिक वाहतुकीपासून ते आंतरजिल्हा बससेवेपर्यंत अनेक नवीन पर्याय प्रवाशांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यापासून राष्ट्रीय आणि परदेशातील उड्डाणासाठी आलेल्या प्रवाशांना पिण्याचे पाणी आणि इतर सुविधा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच बॅगेज मिळण्यात होत असल्याच्या दिरंगाईबाबत अनेकदा प्रवाशांनी समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली होती. अखेर प्रशासनाने ‘सकाळ’च्या बातमीची दखल घेत प्रवाशांना होत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विविध उपाययोजना करीत असल्याचे स्पष्ट केले. नाशिक, पुणे, कोल्हापूर यांसारख्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी विमानतळाची थेट कनेक्टिव्हिटी साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत चर्चा सुरू आहे. लवकरच या मार्गांवर एसटी महामंडळाच्या लक्झरी बस सुरू केल्या जाणार आहेत. याशिवाय, मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या ‘चलो बस’सेवेच्या रात्रीच्या फेऱ्या वाढवण्याचे नियोजन आहे, असल्याचे एनएमआयएने सांगितले.
--------------------------
स्थानिक वाहतूक व टॅक्सी पर्याय
सार्वजनिक वाहतुकीसाठी एनएमएमटीतर्फे सकाळी ६ ते रात्री १२.३० या वेळेत दर १५ मिनिटांनी तरघर, नेरूळ, खारकोपर, बामणडोंगरी, बेलापूर आणि पनवेल स्थानकांसाठी बससेवा चालवली जात आहे. तसेच प्रवाशांना उबेर, ओला, रॅपिडो, ऑल माइल्स, अलाईट यांसारख्या ॲपआधारित कॅब्स, फर्स्ट कार व डब्ल्यूटीआय कॅब्सच्या प्री-पेड टॅक्सी, उबेर ऑटो आणि ‘भारत टॅक्सी’ असे विविध पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.
--------------------------
बॅगेज डिलिव्हरी व गर्दी व्यवस्थापन
ऑगस्ट महिन्यात ‘लास्ट-बॅगेज डिलिव्हरी’ची ९४ टक्के कामगिरी नोंदवली गेली असून ती जागतिक मानकांनुसार आहे. पीक अवरमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी चेक-इन, सिक्युरिटी आणि बॅगेज हँडलिंगसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केले जात असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.
--------------------------
पाणी, चार्जिंग व अन्न-पेये सुविधा
टर्मिनलवर प्रवाशांसाठी मोफत पिण्याचे पाणी आणि मोबाईल चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध असून त्यांच्या देखभालीसाठी विशेष ई अँड एम टीम कार्यरत आहे. तसेच प्रवाशांना ‘अदाणी वन’ ॲपद्वारे खाद्यपदार्थांवर विविध सवलती आणि ऑफर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
---------------------------------------------------
खालीलप्रमाणे सुधारणा
- एनएमआयएची ‘ग्राऊंड ट्रान्स्पोर्टेशन टीम’ सोशल मीडिया, माध्यम रिपोर्टस् आणि थेट प्रवाशांशी साधल्या जाणाऱ्या संवादातून येणाऱ्या तक्रारींची दखल घेते.
- ॲपआधारित कॅबचालकांनी प्रवाशांकडून चुकीच्या पद्धतीने जास्त भाडे आकारल्याचे निदर्शनास आल्यास, एनएमआयएने संबंधित एजन्सींसोबत पाठपुरावा करून प्रवाशांना रक्कम परतावा मिळवून दिला आहे.
- पिण्याचे पाणी आणि मोबाईल चार्जिंग यांसारख्या मूलभूत सुविधा कार्यरत राहण्यासाठी एक समर्पित इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल व टीम तैनात
- पीक अव्हर्समध्ये (गर्दीच्या वेळी) चेक-इन, सिक्युरिटी काउंटर आणि बॅगेज हँडलिंग विभागात प्रवाशांची गर्दी वाढल्यास प्रवासाची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त क्रू आणि संसाधने तत्काळ तैनात केली जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.