...तर आधीच्या निवडणुका वैध कशा?
केदार दिघेंचा निवडणूक आयोगाला सवाल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत तब्बल दोन कोटी सात लाख मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली जात असल्याचा दावा ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी आज केला. अपात्र ठरविले जाणारे मतदार यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदान करून गेले असतील, तर त्यांच्या मतांच्या आधारे झालेल्या निवडणुकांच्या विश्वासार्हतेचे काय, असा सवाल दिघे यांनी निवडणूक आयोगाला केला आहे.
विधानसभा आणि महापालिका निवडणुका याच मतदार याद्यांच्या आधारे पार पडल्या आहेत. त्यामुळे सध्याच्या पुनरीक्षणात वगळली जाणारी नावे यापूर्वीच्या मतदार यादीत कोणत्या आधारे समाविष्ट करण्यात आली होती, त्यांची पडताळणी कोणी केली आणि त्यांना मतदानाचा अधिकार कसा मिळाला, याचे स्पष्टीकरण आयोगाने जनतेसमोर द्यावे, अशी मागणी दिघे यांनी केली.
मतदार यादीतील चुकीच्या अथवा अपात्र नोंदींचा मागील निवडणुकांच्या निकालांवर परिणाम झाला होता का, याचीही चौकशी करावी. या नोंदी असलेल्या मतदारांनी मागील निवडणुकांमध्ये मतदान केले असल्यास त्यांच्या मतांचा निकालावर काही परिणाम झाला का, हे तपासणे आवश्यक आहे. आज हे मतदार अपात्र ठरत असतील, तर त्यांना यापूर्वी मतदानाची परवानगी कशी देण्यात आली, मतदार यादीतील या त्रुटीची जबाबदारी कोणाची, असा प्रश्नही दिघे यांनी उपस्थित केला.
चूक यंत्रणेची, प्रश्न मतदारांना का?
मतदार याद्या तयार करणे आणि त्यांचे वेळोवेळी पुनरीक्षण करणे ही निवडणूक यंत्रणेची जबाबदारी आहे. सध्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर त्रुटी समोर येत असतील, तर त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी दिघे यांनी केली. आधी चुकीच्या नोंदी ठेवायच्या, त्याच आधारे निवडणुका घ्यायच्या आणि नंतर त्या नोंदी चुकीच्या असल्याचे सांगून नावे वगळायची, ही पद्धत कायद्याच्या आणि लोकशाहीच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी केला.
अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी राहिल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी. निष्काळजी किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी दिघे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.