लोकल रखडल्याने प्रवाशांचा संताप
रेल्वे ब्लॉकमुळे आंबिवली, डोंबिवली स्थानकात प्रवाशांचा उद्रेक
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : रेल्वेच्या विशेष ब्लॉकमुळे कल्याण-कसारा मार्गावरील लोकल सेवा विस्कळित झाल्याने गुरुवारी (ता. ३) प्रवाशांचा संताप पाहायला मिळाला. आंबिवली स्थानकात लोकल तासभर उशिरा आल्याने संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तर कार्यालयाबाहेर गर्दी करीत नाराजी व्यक्त केली. याच वेळी डोंबिवली स्थानकातही लोकल विलंबामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. या गोंधळाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आंबिवली स्थानकात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने प्रवासी स्टेशन मास्तर कार्यालयाबाहेर जमा झाले. लोकल तासभर उशिराने धावत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला. तसेच लोकल उशिराने धावणार असल्याची किंवा वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलांची योग्य माहिती वेळेत दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
परिस्थिती लक्षात घेऊन आरपीएफ आणि जीआरपीचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, डोंबिवली स्थानकातही लोकल सेवेतील विलंबामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. रेल्वे प्रशासनाने ब्लॉकदरम्यानच्या बदलांची माहिती प्रवाशांना वेळेत आणि स्पष्टपणे द्यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली.
--------------
१५ डब्यांच्या लोकलसाठी टिटवाळा स्थानकातील काम
टिटवाळा स्थानकात १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटाचा विस्तार करण्याचे काम रेल्वेकडून सुरू आहे. या कामासाठी २८/२९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ११/१२ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात २/३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ८/९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत रात्रीच्या वेळेत कल्याण-टिटवाळा-कसारा मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम होणार आहे.
----------------------
टिटवाळा स्थानकातील फलाट विस्ताराचे काम भविष्यात प्रवाशांना अधिक चांगली सुविधा मिळावी, यासाठी करण्यात येत आहे. कामाच्या काळात काही प्रमाणात गैरसोय होणे अपेक्षित असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.
- पी. डी. पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.