मुंबई

कूपरमध्ये केमोथेरपी केंद्रासाठी जागा निश्चित

CD

‘कूपर’मध्ये केमोथेरपी केंद्रासाठी जागा निश्चित
पश्चिम उपनगरातील कर्करोग रुग्णांना दिलासा; साधनसामग्रीच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पश्चिम उपनगरातील कर्करोग रुग्णांना उपचारांसाठी शहरातील मोठ्या रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी कूपर रुग्णालयात कर्करोग उपचार विभाग उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या विभागातील केमोथेरपी केंद्रासाठी जागा निश्चित करून ती केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे; मात्र आवश्यक साधनसामग्रीची खरेदी अद्याप प्रक्रियेत असल्याने प्रत्यक्ष सेवा सुरू होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे.
कूपर रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील ‘सी’ विंगमध्ये केमोथेरपी केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेची स्वच्छता आणि प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे. केमोथेरपीसाठी आवश्यक उपकरणे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्यासाठी शासकीय ई-बाजारपेठेवर निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेसाठी १२ सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत आहे.
केमोथेरपी केंद्र सुरू झाल्यास विशेषतः अंधेरी, विलेपार्ले, जुहू, सांताक्रूझ, वांद्रे तसेच पश्चिम उपनगरातील इतर भागांतील रुग्णांना नियमित उपचारांसाठी दक्षिण मुंबईतील किंवा इतर मोठ्या कर्करोग रुग्णालयांवर असलेले अवलंबित्व काही प्रमाणात कमी होऊ शकते.

कर्करोगतज्ज्ञांची ओपीडी सुरू
रुग्णालयात कर्करोग उपचार विभाग उभारण्याच्या प्रक्रियेला मनुष्यबळाच्या पातळीवरही सुरुवात झाली आहे. कर्करोगतज्ज्ञ डॉ. श्रेया गट्टाणी १६ जुलैपासून कूपर रुग्णालयात सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून सध्या कर्करोग रुग्णांसाठी बाह्यरुग्ण सेवा सुरू आहे. दर मंगळवारी दुपारी १.३० वाजता ही ओपीडी घेतली जाते. सध्या कर्करोगाचे निदान झालेल्या किंवा संशयित रुग्णांची तपासणी, आजाराचे स्वरूप समजून घेणे आणि पुढील उपचारांचे नियोजन या टप्प्यावर सेवा दिली जात आहे. केमोथेरपी केंद्र सुरू झाल्यानंतर या रुग्णांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्याची गरज काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

औषधांसाठी ट्रस्टची मदत
कर्करोगावरील उपचारांचा खर्च अनेक रुग्णांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने औषधांसाठी आर्थिक मदत मिळविण्याचाही प्रयत्न रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. यासाठी बुधराणी ट्रस्टशी चर्चा झाली आहे. २७ जुलै रोजी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना औषधांसाठी मदत करण्याबाबत ट्रस्टने सकारात्मक भूमिका घेतली.

सुरक्षिततेसाठी स्वतंत्र यंत्रणा
केमोथेरपीची औषधे हाताळताना आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने बायोसेफ्टी कॅबिनेटची खरेदीही प्रस्तावित आहे. त्यासाठीही शासकीय ई-बाजारपेठेच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू आहे. आवश्यक उपकरणे उपलब्ध झाल्यानंतर केंद्र प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पुढील टप्प्यातील कार्यवाही करता येणार आहे.

पश्चिम उपनगरातील रुग्णांना फायदा
कर्करोगावरील उपचारांमध्ये केमोथेरपीसोबत शस्त्रक्रिया, किरणोपचार, तपासण्या आणि इतर तज्ज्ञ सेवांचीही गरज भासते. कूपरमध्ये सध्या या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्याने रुग्णांना गरजेनुसार इतर रुग्णालयांकडे जावे लागू शकते. त्यामुळे प्रस्तावित कर्करोग विभागाचा विस्तार कितपत होतो आणि त्यात कोणकोणत्या सेवा उपलब्ध होतात, याकडेही रुग्णांचे लक्ष आहे.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT