गणवेशासाठी अजूनही प्रतीक्षा
महापालिका शाळांतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाटप रखडले
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) ः पालिकेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले, तरी अद्याप विद्यार्थ्यांना पूर्ण गणवेश मिळालेला नाही. विशेषतः इयत्ता आठवी ते दहावीच्या माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही पुरवठा पूर्ण न झाल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महापालिकेच्या शाळांमधील गणवेश खरेदीचा प्रस्ताव एप्रिलमध्ये मंजूर करण्यात आला होता. यंदा महिला बचत गटांकडून गणवेश शिवून घेण्याऐवजी मे. मफलतला इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला गणवेश पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले. यानुसार सुमारे २३ कोटी ३३ लाख ३० हजार ३५५ रुपयांचा गणवेश पुरवठा करण्यात येणार आहे. महापालिका शाळांमधील सुमारे ५० हजार ५५० विद्यार्थ्यांना दैनंदिन वापराचा गणवेश, तसेच पीटी आणि स्काउट-गाइड गणवेश देण्यात येणार आहे. या गणवेशांचा पुरवठा १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र आचारसंहितेमुळे निर्णय प्रक्रियेला विलंब झाल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर संबंधित कंत्राटदाराने अतिरिक्त मुदत मागितल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. जुलै महिन्यातच कंत्राटदाराला गणवेशाचा पुरवठा पूर्ण करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; मात्र त्यानंतरही संपूर्ण पुरवठा झालेला नसल्याने माध्यमिक वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
८० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला असून उर्वरित २० टक्के विद्यार्थ्यांना गणवेशाचा पुरवठा लवकरच पूर्ण केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे; मात्र ऑगस्ट संपून सप्टेंबर सुरू झाला तरी गणवेश पूर्णपणे उपलब्ध न झाल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. विशेषतः माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा करावी लागत आहे. ऑगस्टमध्ये शाळा सुरू झाल्यानंतरही गणवेश पूर्ण न झाल्याने काही विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशावर अथवा स्वतःच्या कपड्यांवर शाळेत यावे लागत असल्याचे चित्र आहे.
उशीर झाल्यास कंत्राटदाराला दंड
गणवेश पुरवठ्यासाठी निश्चित केलेल्या मुदतीनंतर विलंब झाल्यास कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद कंत्राटात आहे. पहिल्या आठवड्यासाठी ०.५ टक्के, दुसऱ्या आठवड्यासाठी एक टक्का आणि तिसऱ्या आठवड्यासाठी १.५ टक्के, तर त्यानंतरच्या विलंबासाठी कंत्राटातील तरतुदीनुसार दंड आकारण्यात येणार आहे. हा दंड कंत्राटदाराच्या अंतिम बिलातून वसूल केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना येत्या दहा दिवसांत गणवेशवाटप पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्या आहेत. सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला असून उर्वरित विद्यार्थ्यांचा पुरवठा लवकरच पूर्ण केला जाईल.
- संघमित्रा खिल्लारे, उपायुक्त, शिक्षण विभाग, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.