दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज!
आज मुंबईत रंगणार उंच थरांची चुरस; सुरक्षिततेला प्राधान्य
रजनीकांत साळवी ः सकाळ वृत्तसेवा
प्रभादेवी, ता. ४ ः श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी मुंबईतील गोविंदा पथके सज्ज झाली असून, शहरातील विविध भागांत सरावाला वेग आला आहे. ढोल-ताशांचा गजर आणि ‘गोविंदा आला रे आला’च्या जयघोषात गोविंदा पथके थर रचण्याचा कसून सराव करीत आहेत.
दहीहंडी उत्सवाला मुंबईच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात विशेष महत्त्व आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर, प्रभादेवी, माहीम, वरळी, लालबाग, माझगाव, जोगेश्वरीमधील विविध गोविंदा पथकांकडून सकाळ-संध्याकाळ सराव सुरू आहे.
उंच थर रचण्यासाठी आवश्यक असलेले संतुलन, समन्वय, वेग आणि एकमेकांवरील विश्वास यावर विशेष भर दिला जात आहे. अनुभवी गोविंदांकडून नव्या सदस्यांना थर रचण्याचे तंत्र तसेच सुरक्षितपणे थर उतरविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
यंदा विविध मंडळांकडून आकर्षक दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले असून, मानाच्या तसेच लाखो रुपयांच्या मोठ्या बक्षिसांच्या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
प्रभादेवी येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या दहीहंडी आयोजकांपैकी आमदार महेश सावंत यांच्या सह्याद्री प्रतिष्ठानची हंडी, उमेश गावडे यांची मनसेची चार लाखांची हंडी, श्रेयस पाडावे यांनी लावलेली ४.५ लाखांची मानाची हंडी फोडण्यासाठी मुंबईतील अनेक गोविंदा पथक दरवर्षी येतात.
प्रभादेवी दादरमधील अव्वल समजले जाणारे विजय बजरंग, ब्राम्हणदेव, यंग प्रभादेवी, अमर सुभाष गोविंदा पथक हंडी फोडण्यासाठी सज्ज झाली असून लाखोंची हंडी फोडण्याची चुरस पाहायला मिळणार आहे. दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. सरावाच्या वेळी प्रशिक्षित मार्गदर्शकांची उपस्थिती, आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर आणि वैद्यकीय मदतीची उपलब्धता याकडे आयोजक व पथकांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. संघभावना, शिस्त आणि एकजुटीचे दर्शन घडविणाऱ्या दहीहंडी उत्सवाची आतुरतेने प्रतीक्षा असून, यंदा कोणते गोविंदा पथक उंचच उंच थर रचत दहीहंडी फोडणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
सुरक्षित दहीहंडी फोडण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. आठ थर लावून खाली सुरक्षित उतरवून आमची परंपरा जोपासणार आहोत.
- विजय नागवेकर, प्रशिक्षक, अमर सुभाष गोविंदा पथक
यंदा दहा थर लावण्याचा सराव केला आहे. उत्सवाच्या दिवशी सुरक्षित दहा थर लावण्यासाठी आमची उत्सुकता वाढली आहे.
- निखिल नांदगावकर, प्रशिक्षक, आर्यन्स गोविंदा पथक
यावर्षी आम्ही सहा थर रचणार आहोत. शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव साजरा करू. योग्य सरावानंतर आता हंडी फोडण्याची आतुरता लागली आहे.
- धवल देसाई, प्रशिक्षक, यंग प्रभादेवी गोविंदा पथक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.