चांदीबाई कॉलेजवर
‘डिजिटल डल्ला’
सायबर चोरांचा २३ लाख ७६ हजारांना गंडा
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : सायबर चोरांनी शैक्षणिक संस्थेला लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरात उघडकीस आला आहे. चांदीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या वैयक्तिक खात्यासह कॉलेजच्या खात्यावर डल्ला मारत तब्बल २३ लाख ७६ हजार रुपये परस्पर वळविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यूपीआय सुविधा सक्रिय नसतानाही कॉलेजच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याने बँकिंग सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
चांदीबाई महाविद्यालयाच्या प्राचार्य मंजू पाठक यांच्या कॅनरा बँक खात्यातून यूपीआयद्वारे १५ ते १७ ऑगस्टदरम्यान सहा लाख सात हजार ३८५ रुपयांचे अनधिकृत व्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच कालावधीत चांदीबाई महाविद्यालयाच्या कॅनरा बँकेतील चालू खात्यातूनही १६ लाख ६९ हजार २२९ रुपये परस्पर वळविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. प्राचार्य मंजू पाठक आणि महाविद्यालयाच्या खात्यावर ऑनलाइन बँकिंग किंवा यूपीआय सुविधा सक्रिय नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. व्यवहारांवेळी संबंधित मोबाईलवर सांकेतिक अंक आले; मात्र खातेदारांच्या संमतीशिवाय त्यांचा वापर झाला. दोन्ही खात्यात मिळून एकूण २३ लाख ७६ हजार ६१४ रुपयांची फसवणूक झाली असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आणि अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यूपीआय सुविधा नसताना व्यवहार झाले कसे आणि सांकेतिक अंकांचा गैरवापर कोणी केला, याचा तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.