महापालिकेत लोकप्रतिनिधींमध्ये राडा
भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांच्यासह समर्थकांवर गुन्हे
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) : उल्हासनगर महापालिकेच्या गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीच्या सभापती कार्यालयात कामे आणि निविदांच्या चर्चेदरम्यान भाजपच्या दोन नगरसेवकांच्या गटांत जोरदार मारामारी आणि तोडफोड झाल्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात भाजप नगरसेवक प्रधान पाटील आणि नगरसेवक विपुल मयेकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिम ट्रेनिंगचा व्यवसाय करणारे मोहन चंद (४३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते पालिकेतील कामे आणि निविदांसंदर्भात चर्चा करण्यासाठी नगरसेवक पाटील यांच्यासोबत मयेकर यांच्या कार्यालयात गेले होते. त्या वेळी कार्यालयात उपस्थित अभिषेक राठोड, देवा मेहकर, श्रीनिवासा हुरुडुडे, सुरी लबाना, दोन अंगरक्षक आणि इतर समर्थकांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप चंद यांनी तक्रारीत केला आहे.
या मारहाणीत चंद यांच्या उजव्या मनगटाला आणि छातीला दुखापत झाली. तसेच त्यांचे घड्याळ आणि सोन्याची अंगठी गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. पालिकेत पुन्हा आल्यास बघून घेण्याची धमकी मयेकर यांनी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पेपरवेटने मारल्याचा आरोप
दुसऱ्या बाजूने विपुल मयेकर (३०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जुन्या वादाचा राग मनात धरून प्रधान पाटील, जतीन पाटील, कल्पेश भोईर, मोहन, कल्पेश आणि अन्य १० ते १५ जण कार्यालयात घुसले. या वेळी जतीन पाटील यांनी चहाचा कप डोक्यात मारला, तर प्रधान पाटील यांनी पेपरवेटने डोक्यावर मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे मयेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, उल्हासनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा गटनेते राजेश वधारिया यांनी हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे सांगितले. ‘‘या प्रकरणाबाबत पक्षाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल,’’ असे त्यांनी स्पष्ट केले.