महापालिकेच्या वाहनासमोर ठिय्या
डोंबिवलीत फेरीवाला हटाव कारवाईला विरोध
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : डोंबिवली पूर्वेतील नेहरू रोड परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकाला विरोध करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात काही फेरीवाल्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान फेरीवाल्यांनी महापालिका वाहनासमोर ठिय्या मांडल्याने नेहरू रोडवर सुमारे अर्धा तास वाहतूक कोंडी झाली.
‘शहर फेरीवालामुक्त’ मोहिमेअंतर्गत डोंबिवलीत काही भागांत कारवाई सुरू आहे. शुक्रवारी (ता. ४) रात्री नऊच्या सुमारास फ प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर, पथकप्रमुख आणि महापालिका कर्मचारी नेहरू रोड परिसरात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. कारवाई सुरू होताच मोठ्या संख्येने फेरीवाले एकत्र आले आणि त्यांनी कारवाईला विरोध केला.
या वेळी अधिकारी आणि फेरीवाल्यांमध्ये बाचाबाची झाली. कारवाईला विरोध करीत काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या वाहनासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे वाहन पुढे जाऊ शकले नाही आणि रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. या प्रकारामुळे वाहनचालक तसेच नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. पोलिसांनी हस्तक्षेप करून रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांना बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, नेहरू रोडसह स्टेशन रोड आणि फडके रोड परिसरात महापालिकेकडून नियमितपणे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर यांनी सांगितले. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहर फेरीवालामुक्त करण्याची मोहीम सुरू असून, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न शहर फेरीवाला समितीच्या स्तरावर चर्चेत आहे. त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.