ठाण्यात मनसेच्या दहीहंडीचा थरार!
पाच गोविंदा पथकांकडून नऊ थरांची सलामी
कांदिवलीच्या साई माउली पथकाला हंडी फोडण्याचा पहिला मान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ढोल-ताशांचा कडकडाट, ‘गोविंदा आला रे...’चा जयघोष आणि नऊ थरांचा थरार अनुभवत आज ठाण्यात मनसेच्या दहीहंडी उत्सवाला रंगत आली. मुंबई आणि ठाणे परिसरातील गोविंदा पथकांनी उत्साहाने सहभाग घेत उंचच उंच मानवी मनोरे रचले. या वेळी पाच गोविंदा पथकांनी नऊ थरांची सलामी दिली. त्यामध्ये कांदिवलीच्या साई माउली गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्याचा पहिला मान मिळाला.
उत्सवात सकाळपासूनच गोविंदा पथकांची लगबग सुरू होती. दहीहंडी फोडण्यासाठी आवश्यक असलेली एकजूट, अचूक समन्वय आणि सराव याचे दर्शन प्रत्येक थराच्या वेळी घडत होते. गोविंदांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा देत मानवी मनोरे रचले आणि हंडीच्या दिशेने झेप घेतली. नऊ थरांचा टप्पा गाठताच परिसरात टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष झाला. या दहीहंडी उत्सवात ओमकार गोविंदा पथक, गिरगाव; साईराम गोविंदा पथक, जोगेश्वरी; छत्रपती गोविंदा पथक, कांजूरमार्ग; शिव गणेश गोविंदा पथक, नालासोपारा आणि साई माउली गोविंदा पथक, कांदिवली या पाच पथकांनी नऊ थर रचण्यात यश मिळवले.
कांदिवलीच्या साई माउली गोविंदा पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने थरांची उभारणी करीत हंडीपर्यंत मजल मारली. हंडी फुटताच गोविंदांनी जल्लोष केला. दहीहंडीच्या निमित्ताने परिसरात पारंपरिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ढोल-ताशांच्या तालावर गोविंदा पथकांसह नागरिकांनीही ठेका धरला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे उत्सवाला आणखी रंगत आली. गोविंदांच्या साहसाचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.