पनवेलमध्ये दहीहंडीचा उत्साह
गोविंदा पथकांची संख्या घटली; उकाड्यामुळे सलामीला विलंब, सायंकाळच्या पावसाने वाढवला उत्साह
पनवेल, ता. ६ (बातमीदार) ः ‘गोविंदा आला रे आला...’च्या जयघोषात शनिवारी (ता. ५) पनवेल परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने आयोजन करण्यात आले असले, तरी मागील वर्षांच्या तुलनेत यंदा उत्सवाला काहीसा कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसले. विशेषतः मुंबईतील गोविंदा पथकांची उपस्थिती रोडावली होती. दिवसभरातील प्रचंड उकाड्यामुळे सलामीला उशिरा सुरुवात झाली; मात्र सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरणात पुन्हा उत्साह संचारला.
पनवेल परिसरातील दहीहंडी उत्सवाचे प्रमुख केंद्र म्हणून यंदाही कामोठे वसाहत लक्षवेधी ठरली. या भागात सर्वाधिक दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आल्याने विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. आमदार विक्रांत पाटील यांच्या वतीने कामोठ्यात दोन दहीहंड्यांचे आयोजन केले होते. त्याचबरोबर नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या बक्षिसांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरू झालेल्या या उत्सवात गोविंदा पथकांनी सहा-सात थरांची सलामी देत उपस्थितांना थराराचा अनुभव दिला.
कामोठे सेक्टर ३६ येथे पारनेर रहिवासी संघाच्या वतीनेही दहीहंडी उत्सव उत्साहात पार पडला. या ठिकाणी पारंपरिक दहीहंडीबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. भाजप कामोठे मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडीही परिसरातील विशेष आकर्षण ठरली. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ऐश्वर्या हॉटेलसमोरील मैदानात दहीहंडीचे आयोजन केले होते.
कळंबोलीतही गोविंदांचा जल्लोष!
कळंबोली परिसरातही विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रोडपाली बस डेपोच्या मैदानावर भाजपचे स्थानिक पदाधिकारी अमर ठाकूर आणि नगरसेविका मनाली ठाकूर यांच्या वतीने दहीहंडी आयोजित केली होती. आमदार विक्रांत पाटील यांच्या वतीने मंगलेश्वरी माता मंदिरासमोरही दहीहंडी पार पडली. कळंबोली बीमा नाका परिसरातील हनुमान मंदिरात नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. धार्मिक वातावरण, गोविंदांचा जल्लोष आणि नागरिकांचा सहभाग यामुळे या ठिकाणी उत्साहाचे वातावरण होते. याशिवाय खारघर, नावडे, पनवेल आणि तळोजा परिसरातही विविध मंडळे, सामाजिक संस्था आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी खेळ, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि गोविंदा पथकांच्या सलामीचे आयोजन करण्यात आले.
रस्ते मोकळे; पण वाहनकोंडी कायम!
कामोठे वसाहतीमध्ये यंदा रस्त्यावर दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आली नसल्याने प्रमुख रस्ते तुलनेने मोकळे दिसून आले; मात्र विविध ठिकाणी आलेल्या नागरिकांच्या आणि वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायम राहिली. विशेषतः सायंकाळच्या वेळेत प्रमुख चौक आणि दहीहंडीच्या ठिकाणांकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावला.
ध्वनिप्रदूषणावरही काहीसा आळा!
यंदाच्या दहीहंडी उत्सवात ध्वनिवर्धकांच्या आवाजाची पातळी मागील तुलनेत कमी असल्याचेही जाणवले. संपूर्ण पनवेल परिसरात मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांचा वापर काही प्रमाणात नियंत्रित राहिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. उत्सवाचा जल्लोष कायम ठेवतानाच ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याचा प्रयत्न अनेक आयोजकांकडून झाल्याचे चित्र होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.