दिवाळे कोळीवाड्यात पारंपरिक कृष्ण जन्माष्टमी उत्साहात
तुर्भे, ता. ६ (बातमीदार) ः आधुनिकतेच्या प्रवाहात नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास होत असतानाही मूळ गावठाणांनी आपली पारंपरिक संस्कृती आणि धार्मिक परंपरा जपून ठेवली आहे. याचाच प्रत्यय दिवाळे कोळीवाड्यात पाहायला मिळाला. समस्त दिवाळे ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हनुमान मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता कृष्ण जन्माष्टमीच्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली.
जन्माष्टमीमित्ताने हनुमान मंदिरात आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाई केली होती. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची वर्दळ सुरू होती. पारंपरिक पद्धतीने फुलांची उधळण करीत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपप्रसंगी रात्री १२.४० वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. या वेळी संपूर्ण गावकरी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने जन्मोत्सवाचा आनंद लुटला. ‘गोविंदा’, ‘गोपाल’ आणि ‘श्रीकृष्ण’ नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. या वेळी श्री गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ, कोपर येथील सुप्रिया घरत तसेच वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार ह.भ.प. स्नेहल पित्रे यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
पावल्यांचा खेळ ठरले आकर्षण
उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील पारंपरिक सांस्कृतिक वातावरण. संत मंडळींनी पारंपरिक वेशभूषा धारण करून टाळ-मृदंगाच्या तालावर पावल्या खेळल्या, तर महिला भाविक फुगड्यांच्या फेरात रमल्या. भक्ती, परंपरा आणि सामूहिक आनंदाचा सुरेख संगम या वेळी अनुभवायला मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.