गणेशोत्सवापूर्वी पदपथ अडथळामुक्त करा
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
वाशी, ता. ६ (बातमीदार) ः गणेशोत्सवापूर्वी शहरातील पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. कैलास शिंदे विविध विभागांच्या आढावा बैठकीत दिले. पदपथांवरील अधिकृत फेरीवाल्यांना पर्यायी जागेत हलवून अनधिकृत फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई करण्यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र आराखडा तयार करावा, असे स्पष्ट करण्यात आले.
पदपथांवरून नागरिकांना विनाअडथळा चालता यावे, यासाठी पदपथावरील अधिकृत फेरीवाल्यांना पर्यायी जागेत हलविणे आणि अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यासाठी काटेकोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. ही कारवाई केवळ एकदाच न करता त्यामध्ये सातत्य राखावे, अशी सूचनाही त्यांनी केली. प्रत्येक विभाग कार्यालयाने त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून पथके नियुक्त करावीत तसेच कारवाई करावयाच्या भागांचा प्राधान्यक्रम ठरवून नियमित मोहीम राबवावी, असे त्यांनी स्पष्ट केले. शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके आणि बाजारपेठ परिसरातील अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाल्यांकडे विशेष बारकाईने लक्ष देण्याचे निर्देशही देण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, परिमंडळ उपआयुक्त डॉ. अमोल पालवे व संजय शिंदे तसेच पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदेश नाईक, पोलिस निरीक्षक थिटे आणि सिडको अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शाळा परिसरातील पानटपऱ्या हटवा
सध्या अमली पदार्थांच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सापडत असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शाळा व महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयाच्या बाहेर ५० मीटर परिसरात पानटपरी दिसता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी समन्वय साधून सातत्यपूर्ण कारवाई करण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या मोहिमेत पोलिस विभागाने संपूर्ण सहकार्य करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
रात्रीच्या कारवाईसाठी स्वतंत्र पथके
पालिकेमार्फत दिवसा अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असली तरी सायंकाळनंतर अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहत असून, मध्यरात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने रात्रीच्या कारवाईसाठी स्वतंत्र पथके तयार करून रात्रीच्या वेळीही धडक कारवाया सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. रात्री ११ वाजल्यानंतर रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रीस मनाई करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर दररोज सातत्याने अधिक प्रभावी कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
बेवारस वाहने हटविणार
शहरातील रस्त्यांवर तसेच रेल्वे स्थानकांच्या पार्किंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात धूळखात पडलेली व बेवारस वाहने असल्याने शहराच्या स्वच्छतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे पोलिस विभागाच्या सहकार्याने सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीत मोहीम राबवून अशी वाहने हटविण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.