नवी मुंबईत ‘गोविंदा’च्या गजरात थिरकली तरुणाई
कलाकारांची उपस्थिती अन् गाण्यांच्या ठेक्यावर बालगोपाळ थिरकले
वाशी, ता. ६ (बातमीदार) ः ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष... तरुणाईचा बेधुंद जल्लोष... नागरिकांची गर्दी... गोविंदा पथकांच्या थरांचा थरार आणि वरुणराजाने लावलेली हजेरी अशा वातावरणात शनिवारी (ता. ५) नवी मुंबईत गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. चौकाचौकांत, गल्ल्यांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये बालगोपाळांच्या उत्साहात दहीहंड्या फोडण्यात आल्या.
यंदा मुंबईकरांनी नवी मुंबईतील असणाऱ्या दहीहंडीकडे लक्ष केंद्रित केले होते. नवी मुंबईतील गोविंदांचेदेखील पथक असल्यामुळे त्यांनी नवी मुंबईतील दहीहंड्यांना हजेरी लावल्याचे दिसून आले.
यंदा दहीहंडी उत्सवात लोकप्रिय गाण्यांच्या ठेक्यावर तरुणाई थिरकली. ऐरोली येथे शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांच्या माध्यामातून सुनील चौगुले स्पोर्टस् असोसिएशनच्या कार्यक्रमात लावणी नृत्यांगना गौतमी पाटील, मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू, श्रुती मराठे यांनी उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे ऐरोलीतील साईनाथवाडी येथे शिंदे गटाचे नगरेसवक साहिल चौगुले यांच्या पुढाकाराने ‘डेडीकेटेड टू कॉमन मॅन’ची दहीहंडी लावली होती. या वेळी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. ऐरोली सेक्टर आठ येथील विबग्योर शाळेसमोरील प्रांगणात शिंदे गटाचे युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांची दहीहंडी उत्साहात पार पडली. घणसोलीत नगरसेवक अंकुश कदम युवा फाउंडेशन आणि सौरभ शिंदे यांच्या माध्यमातून दहीहंडी आयोजित केली होती. उत्सवामध्ये शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
टॅटू आणि अतरंगी स्टाइलची क्रेझ
पारंपरिक वेशभूषेसोबतच अंगावर आई-वडिलांची नावे, स्वतःचे नाव, देवांचे फोटो असे विविध टॅटू काढून तरुणाई मिरवताना दिसली. याशिवाय केसांना रंगीबेरंगी रंगवणे आणि डोक्यावर केसांचा टोप घालणे अशा अतरंगी स्टाइलची क्रेझ तरुण गोविंदांमध्ये पाहायला मिळाली.
चौकाला बॅनर्सचा विळखा
दहीहंडी उत्सवानिमित्त शहरांतील चौक हे बॅनरने फुलले होते. या वेळी काहींनी परवानगी घेतली होती. तर काहींनी अनधिकृत बॅनरबाजी करीत प्रसिद्धी घेण्याचा प्रयत्न केला होता. चौकांमध्ये लावलेल्या अनधिकृत बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण झालेले पाहावयास मिळत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.