स्मार्ट सिटीतील गाव-गावठाणात पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी
तुर्भे, ता. ६ (बातमीदार) ः नवी मुंबईत मोठ्या बक्षिसांच्या आणि व्यावसायिक दहीहंड्यांची चुरस पाहायला मिळत असताना, दुसरीकडे स्थानिक गाव-गावठाणांनी आपली ‘एक गाव, एक हंडी’ ही पारंपरिक संस्कृती आजही कायम जपली आहे. काळ बदलला तरी आगरी-कोळी संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या बोली हंड्यांची परंपरा शहरात यंदाही मोठ्या उत्साहात साजरी झाली.
आगरी आणि कोळी समाजाचे विशेष आकर्षण असलेली गावकीची बोली दहीहंडी ही गावातल्या एका मंदिरात बांधली जाते. या दहीहंडीत अख्खे गावच सहभागी होते. गावातून आधी ढोल-ताशांच्या गजरात हंडी घेऊन पालखी मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पालखी गावातील मंदिरात पोहोचल्यानंतर बोली सुरू केली जाते. बोली हंडीची परंपरा ही तुर्भे गाव, कोपरखैरणे, सानपाडा, कोपरी गाव, घणसोली, गोठीवली, ऐरोली गाव, दिवा गाव, नेरूळ अशा २९ गावांमधून अनेक गावांनी आजही जपली आहे. यातील रक्कम आध्यात्मिक कार्यासाठी वापरली जाते
घणसोली, कोपरखैरणे गावात दहीहंडीला वारकरी संप्रदायाची जोड
स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोलीमधील ग्रामस्थांनी दहीहंडी उत्सवाची १२५ वर्षांची परंपरा जपली आहे. गावात दहीहंडीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्या खालोखाल कोपरखैरणे गावातदेखील १९६० पासून सप्ताहाचे आयोजन करत दहीहंडी उत्सव साजरा केला जातो, तर आग्रोली गावातदेखील १९६१ पासून एक गाव एक हंडीची परंपरा कायम आहे. याव्यतिरिक्त शिरवणे गावात पिढ्यान् पिढ्या उंच उडी मारून डोक्याने हंडी फोडण्याची परंपरा सुरू आहे. पावणेगावात डोळ्यांवर पट्टी बांधून दहीहंडी फोडली जाते. सानपाडा गावात रात्रीच्या हंड्या फोडल्या जातात.
कोपरी गावातील हंडीला एक लाख ३० हजारांची बोली
कोपरी गावात रात्री भंडारा भरून श्रीकृष्ण अध्याय वाचनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर श्रीकृष्ण जन्माचा पाळणा गीत साजरा करण्यात आला. तसेच, सकाळी गावातील गावदेवी मंदिरात बोली दहीहंडी बांधण्याची परंपरा आहे. ही हंडी फोडण्यासाठी ग्रामस्थांकडून बोली लावून फोडली जाते. या वर्षी गावातील समाजसेवक वैभव ठाकूर यांनी एक लाख ३० हजारांची बोली लावून हंडी फोडण्याचा बहुमान पटकावला. ही हंडी ठाकूर यांनी आपली मुलगी निवा हिच्या हस्ते फोडली. कोपरी गावातील यंदाची बोली ही आजवरची विक्रमी बोली ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.