मुंबई, ता. ६ : लिंग, पुरुषत्व, लैंगिकता आणि सामाजिक वैविध्य यांसारख्या विषयांकडे सिनेमाच्या माध्यमातून पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. एमएल डहाणूकर महाविद्यालय, साठ्ये महाविद्यालय आणि एमएव्हीए-मेन अगेन्स्ट वायलंस अँड अब्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समभाव’ या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय प्रवासी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ८ आणि ९ सप्टेंबरला मुंबईत होणार आहे.
या महोत्सवात लिंगभान, पुरुषत्व, लैंगिकता आणि वैविध्य या विषयांवर आधारित राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील १६ लघुपट आणि माहितीपट प्रदर्शित केले जाणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत अनुक्रमे एम. एल. डहाणूकर महाविद्यालय आणि साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. ‘दि फर्स्ट फिल्म’, ‘नाम क्या है तुम्हारा’, ‘सीता की बेटी’, ‘ग्रीष्मान्त’, ‘इस तरफ’, ‘बैठी है’, ‘दहेज डिपॉझिट’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा या महोत्सवात समावेश आहे.
विविध सामाजिक आणि लैंगिक प्रश्नांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणाऱ्या या चित्रपटांनंतर प्रेक्षकांना चर्चेची संधीही मिळणार आहे. महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मान्यवर दिग्दर्शक, अभ्यासक, कार्यकर्ते आणि चित्रपट रसिक यांच्यात संवादाचे सत्र आयोजित करण्यात येणार आहे. लिंगसमभाव कार्यकर्ते व अभ्यासक हरीश सदानी, डॉ. विभूती पटेल, डॉ. चयनिका शहा, सिनेदिग्दर्शक पीयूष ठाकूर, रुक्क्षाना तबस्सुम, श्रेय शहा, अमोल बिरेवार, मेहक माथारू, रौनक सांगेर तसेच सिने लेखक अथर्व देशपांडे आणि शिल्पा कांबळे हे मान्यवर या चर्चासत्रांमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईतून सुरू होणारा हा महोत्सव त्यानंतर केरळ, पुणे, यवतमाळ, अमरावती, दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई, तिरुअनंतपुरम तसेच काठमांडू यांसारख्या शहरांतील सुमारे २४ ठिकाणी आयोजित केला जाणार आहे.
या महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून महाविद्यालयीन विद्यार्थी, युवा चित्रपट निर्माते, फिल्म अभ्यासक तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.