ठाण्यातील गायमुख-पायेगाव खाडीपुलाचे काम वेगात
- खाडी भागातील पायलिंगचे ९५ टक्के काम पूर्ण
- प्रकल्पाचे २५ टक्के काम झाले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : ठाण्यासह परिसरातील वाहतुकीला चालना देण्यासाठी एमएमआरडीएकडून उभारल्या जात असलेल्या गायमुख-पायेगावा खाडीपुलाचे काम वेगात सुरू आहे. साडेसहा किलोमीटर लांबीच्या या खाडीपूल प्रकल्पाचे खाडी भागातील पाईल फाउंडेशनचे काम आणि पिलरचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. एकूण प्रकल्पाचा विचार करता सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा खाडीपूल पूर्ण झाल्यानंतर ठाणे, भिवंडी, वसई परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
ठाण्याला मोबिलिटीआधारित आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यानुसार गायमुख ते पायेगाव खाडीपुलाचे काम जोरात सुरू आहे. खाडीच्या भागातील पायलिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच पिअर उभारणी आणि पिअरकॅपचे बांधकामही वेगाने सुरू आहे. प्रकल्पाच्या गायमुख आणि पाये-पायेगाव या दोन्ही टोकांवरही कामाला वेग आला असून एकूण प्रकल्पातील सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे. हा पूल घोडबंदर रोडवरील गायमुखला चिंचोटी आणि पायेगावशी जोडणार असून तो भिवंडी, वसई तसेच एमएमआरच्या उत्तरेकडील भागांशी अधिक थेट संपर्क निर्माण करणार आहे. घोडबंदर रोड हा ठाण्यातील प्रमुख आणि सर्वाधिक वर्दळीच्या वाहतूक मार्गांपैकी एक आहे. या मार्गावरून ठाणे शहर, मुंबईची पश्चिम उपनगरे, मिरा-भाईंदर आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.
घोडबंदर घाटमार्गाला पर्याय
- सध्या ठाण्याहून चिंचोटी, पायेगाव किंवा वसईकडे जाणाऱ्या प्रवाशांना घोडबंदर येथील घाटमार्गातून जावे लागते. या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळेही वाहतुकीवर परिणाम होतो. प्रस्तावित खाडीपूल घोडबंदर घाटमार्गाला पर्याय ठरणार असल्याने प्रवासी व मालवाहतुकीसाठी अधिक वेगवान आणि थेट मार्ग उपलब्ध होईल.
- या पुलामुळे मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे, ठाणे कोस्टल रोड, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, दिवा-वसई रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४८ आणि अंजूर-चिंचोटी रोड यांसह अनेक महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.