सह्याद्री क्रीडा मंडळाचा यंदा ‘सुपर हीरोज’चा थरार!
५०व्या वर्षात पदार्पण; स्पायडरमॅन, अव्हेंजर्स, बॅटमॅन, हल्कसह विविध कलाकृतींची भव्य दुनिया
चेंबूर, ता. ६ (बातमीदार) ः ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या भव्य प्रतिकृती साकारून गणेशभक्तांना अनोख्या कलाकृतींचे दर्शन घडविणाऱ्या टिळकनगर येथील सह्याद्री क्रीडा मंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी ‘सुपर हीरोज’ ही आकर्षक संकल्पना साकारली आहे. मंडळाच्या गणेशोत्सवाने यंदा ५०व्या वर्षात पदार्पण केले असून, त्यानिमित्त उभारण्यात आलेला भव्य देखावा लहान मुलांसह गणेशभक्तांचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
यंदाच्या देखाव्यात
स्पायडरमॅन, अव्हेंजर्स, बॅटमॅन, ही मॅन, इंडियन क्रिस, सुपर चिट्टी, वंडर वूमन आणि हल्क अशा जगातील सर्वात लोकप्रिय सुपर हीरोच्या व्यक्तिरेखा आणि संकल्पना कलाकृतीच्या माध्यमातून साकारण्यात आल्या आहेत. त्यासोबतच रोबोट, एअरप्लेन आदी आकर्षक प्रतिकृतीही उभारण्यात आल्या आहेत.
महागाई आणि धावपळीच्या जीवनामुळे प्रत्येकाला देशातील विविध ऐतिहासिक, धार्मिक तसेच पर्यटनस्थळांना प्रत्यक्ष भेट देणे शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन विविध स्थळांच्या भव्य प्रतिकृती गणेशोत्सवाच्या माध्यमातून भाविकांसमोर सादर करण्याची परंपरा सह्याद्री क्रीडा मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे. त्यामुळे गणेशभक्तांना एकाच ठिकाणी विविध कलाकृती आणि संकल्पनांचा अनुभव घेता येतो.
गेल्या ४९ वर्षांच्या प्रवासात मंडळाने शनिवारवाडा, अजिंठा-वेरूळ लेणी, मथुरा, अयोध्येतील राम मंदिर, हनुमान-बजरंगबली, म्हैसूर पॅलेस, शिर्डी संस्थान, लाल किल्ला, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, स्वामी विवेकानंद मंदिर, अष्टविनायक व गेल्या वर्षी गजराज यांसह अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांवरील भव्य देखावे साकारले आहेत. दरवर्षी वेगळी संकल्पना आणि आकर्षक कलाकृती सादर करण्याची मंडळाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे.
‘कल्पनेतून साकारते एक भव्य दुनिया’ या संकल्पनेतून आर्ट डायरेक्टर नितीन कुमार यांच्या कल्पकतेतून यंदाचा देखावा साकारण्यात आला आहे. आकर्षक प्रकाशयोजना, भव्य सजावट आणि कलात्मक मांडणी यामुळे हा देखावा गणेशभक्तांसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळज आणि उपाध्यक्ष अमित सातर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते देखाव्याच्या अंतिम तयारीत व्यस्त आहेत.
सेलिब्रिटींचीही उपस्थिती
सह्याद्री क्रीडा मंडळाच्या भव्य देखाव्याला यापूर्वी अभिनेते शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, सोनू सूद, आदित्य पंचोली, गोविंदा, वरुण धवन, श्रेयस तळपदे, अभिनेत्री टिस्का चोप्रा, कंगना राणावत यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.