सामाजिक उपक्रमांसाठी ‘पीएए’चा पुढाकार
दासरा नेटवर्क भागीदार; बालशिक्षण, महिला उद्योजकतेसाठी दोन प्रकल्पांना निधी
नवी दिल्ली, ता. ६ ः आशियातील लोककल्याणकारी उपक्रमांना चालना देणाऱ्या टेमासेक ट्रस्टच्या ‘फीलान्थ्रॉपी एशिया अलायन्स’ने (पीएए) भारतातील नेटवर्कचा विस्तार केला आहे. भारतीय लोककल्याण क्षेत्रातील ‘दासरा’ या संस्थेचा अलायन्समध्ये नेटवर्क भागीदार म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर बालशिक्षण आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी रॉकेट लर्निंग आणि फ्रंटियर इनोव्हेशन्सच्या ‘शी लीड्स भारत : उद्यम’ या दोन उपक्रमांना निधी देण्यात येणार आहे.
दासरा भारतीय लोककल्याणकारी कुटुंबे, फाउंडेशन्स आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करते. ‘पीएए’सोबतच्या भागीदारीमुळे भारतातील लोककल्याण क्षेत्र आणि आग्नेय आशियातील पीएएच्या नेटवर्कमध्ये सहकार्य वाढणार आहे. ‘दासरा फीलान्थ्रॉपी वीक’ आणि ‘इंडिया फीलान्थ्रॉपी फोरम’ यांसारख्या व्यासपीठांद्वारे संयुक्त उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. ‘पीएए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शॉन सेओ यांनी भारतातील सामाजिक आणि पर्यावरणीय आव्हानांवर विकसित झालेल्या उपाययोजनांचा इतर देशांनाही फायदा होऊ शकतो, असे सांगितले. भारतीय संस्थांना आशिया आणि जागतिक दक्षिणेकडील देशांमध्ये भागीदारीची संधी उपलब्ध करून देण्याचे पीएएचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रॉकेट लर्निंग ही बालशिक्षण क्षेत्रातील ना-नफा संस्था असून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून स्थानिक भाषांमध्ये कुटुंबांना एआयआधारित बालशिक्षण उपलब्ध करून देते. गेल्या पाच वर्षांत हा उपक्रम १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे ६० लाख मुलांपर्यंत पोहोचला आहे. २०३० पर्यंत पाच कोटी वंचित मुलांपर्यंत पोहोचण्याचे संस्थेचे लक्ष्य आहे. दुसरीकडे फ्रंटियर इनोव्हेशन्सचा ‘शी लीड्स भारत : उद्यम’ हा उपक्रम ‘मेरी सहेली’ या एआय-सक्षम ॲपच्या माध्यमातून ग्रामीण महिला दुकानदार आणि उद्योजकांना ऑनलाइन बाजारपेठेशी जोडतो.
तीन लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट
‘पीएए’च्या निधीतून राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि गुजरातमधील दुर्गम टियर-५ आणि टियर-६ गावांमध्ये हा उपक्रम विस्तारला जाणार आहे. पुढील एका वर्षात १० हजार ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात ३०० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. २०२८ पर्यंत तीन लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.