सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : मोबाईल वाजतो. समोरून ‘पोलिस अधिकारी’ बोलतो... दुसरीकडे भांडवली बाजारात मोठ्या नफ्याचे प्रलोभन दाखवले जाते, तर कधी कुरिअर अडकल्याचा फोन येतो. काही क्षणांत लिंक पाठवली जाते आणि नागरिकाने ती उघडताच बँक खाते रिकामी होते. सायबर गुन्हेगारांच्या या बदलत्या फंड्यामुळे ठाणेकरांच्या आर्थिक सुरक्षिततेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. २०२६च्या पहिल्या आठ महिन्यांत आर्थिक फसवणुकीशी संबंधित तब्बल ३५१ सायबर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये सायबर भामट्यांना ८४ कोटी १३ लाखांना गंडा घातल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. तर दुसरी पोलिसांना सात कोटी ९७ लाखांची रक्कम गोठवण्यात यश आले आहे. तर आतापर्यंत २५ जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘हॅलो’ म्हणताच जाळे!
फसवणुकीसाठी फोन, एसएमएस आणि बनावट लिंक हे सायबर ठगांचे सर्वात सोपे हत्यार बनले आहे. बँक खाते बंद होणार, सिम कार्ड बंद होणार, कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडले किंवा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे, अशी भीती दाखवून नागरिकांकडून गोपनीय माहिती घेतली जाते.
‘डिजिटल अरेस्ट’चा नवा फंडा
पोलिस, कस्टम्स, आयकर विभागातील अधिकारी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉलवर नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली पैशांची मागणी केली जाते. घाबरलेल्या नागरिकांकडून मोठ्या रकमा ऑनलाइन वर्ग करून घेतल्या जातात. यावर्षी सात गुन्ह्यात दोन कोटी ११ लाख २६ हजार ९९७ रुपये गेल्याचे म्हटले आहे.
नफा दाखवला; भांडवलच गायब!
भांडवली बाजार, गुंतवणूक, सेव्हिंग आणि पॉलिसीच्या नावाखाली फसवणुकीची प्रकरणेही समोर आली आहेत. सुरुवातीला छोटा नफा दाखवून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर अधिक पैसे गुंतवण्यास सांगून अखेर नफा तर सोडाच, मूळ रक्कमही हातची जाते. हे गुन्हे ९५ नोंदविण्यात आले असून यामध्ये गेलेल्या ३३ कोटी १० लाखांपैकी एक कोटी ५८ लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे.
क्यूआर कोड, एपीके अन् रिमोट ॲक्सेस
‘पैसे मिळवण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा’, ‘रिफंडसाठी एपीके फाइल डाउनलोड करा’ किंवा ‘तांत्रिक मदतीसाठी रिमोट ॲक्सेस ॲप सुरू करा’, असे सांगून मोबाईल आणि बँक खात्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रकार वाढले आहेत.
३५१ गुन्ह्यांचा धोक्याचा इशारा...
२०२६ मध्ये नोंद झालेल्या आर्थिक सायबर गुन्ह्यांमध्ये ई-वॉलेट व आर्थिक ॲप, फिशिंग कॉल/एसएमएस/लिंक, ऑनलाइन खरेदी, गुंतवणूक, कुरिअर, वीजबिल, क्यूआर कोड, कर्ज ॲप आणि डिजिटल अरेस्ट अशा विविध प्रकारांचा समावेश आहे. काही प्रकरणांत पोलिसांनी फसवणुकीची रक्कम गोठवून वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
रक्कम गोठवण्यात यश
सायबर गुन्ह्यांच्या तब्बल २७ फंड्यांचा वापर चोरटे करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यामध्ये सात कोटी ९७ लाख रक्कम गोठवली असून सर्वाधिक पाच कोटी ३९ लाखांची रक्कमही फिशिंग कॉल, एसएमएस, लिंक याप्रकार आहे. तर भांडवली बाजार, गुंतवणूक, बचत आणि पॉलिसी रिलटेड फंड या गुन्ह्यात एक कोटी ५८ लाखांचा समावेश आहे.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्या दृष्टीने ठाणे शहर दलाकडून योग्य ती पावले टाकली जात आहेत. तसेच पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्ह्यांसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
- प्रकाश वारके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.