सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : शहरातील नागरिकांना डास आणि कीटकजन्य आजारांपासून वाचवण्यासाठी उन्हातान्हात, पावसात रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्यांच्या वारसाहक्काचा प्रश्न अखेर सरकारच्या दारात पोहोचला आहे. फिल्ड वर्कर आणि सुपीरिअर फिल्ड वर्कर कर्मचाऱ्यांच्या वारसांना सफाई कामगारांप्रमाणे नोकरी देता येईल का, याबाबत सरकारचे मार्गदर्शन घेण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आशा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
हत्तीरोग विभागातील कर्मचारी प्रतिनिधींनी १ जुलैला प्रशासनाला पत्र देत वारसाहक्काची मागणी केली. यापूर्वीही हा विषय सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. अखेर प्रस्तावाची सूचना क्र. २० आणि सर्वसाधारण सभा ठराव क्र. ९५५, २८ जुलैच्या आधारे प्रशासनाने सरकारकडे मार्गदर्शन मागण्याची भूमिका घेतली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २४ फेब्रुवारी २०२३च्या शासन निर्णयात सफाई कामगारांची व्याख्या निश्चित करण्यात आली आहे. शौचालय स्वच्छता, मलनिःसारण व्यवस्था, नाले-गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालये आणि शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. लाड समितीच्या शिफारशींनुसार पात्र सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे हत्तीरोग विभागातील प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या तरतुदींचा लाभ मिळणार की नाही, यावर सरकारचे स्पष्टीकरण निर्णायक ठरणार आहे.
पुण्यात मान्यता, ठाण्यात प्रतीक्षा!
पुणे महापालिकेचा निर्णय ठाणे कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. पुणे महापालिकेच्या किटक प्रतिबंध आणि नागरी हिवताप विभागातील वर्ग-४ मधील फिल्डवर्कर कर्मचाऱ्यांना घाणभत्ता आणि धुलाई भत्ता लागू करण्यास सरकारने १७ जून २०२५ रोजी मान्यता दिली आहे. त्याच निर्णयात संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसाहक्काबाबत २४ फेब्रुवारी २०२३च्या शासन निर्णयातील तरतुदींनुसार पालिका स्तरावर नियमोचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मग ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी ही भूमिका लागू होऊ नये, हा प्रश्न आता पालिका प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
नागरिकांच्या आरोग्यासाठी रस्त्यावर; हक्कासाठी मात्र प्रतीक्षा!
हत्तीरोग विभागातील कर्मचारी डास प्रतिबंधक फवारणी, कीटक नियंत्रण आणि विविध सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी थेट क्षेत्रात काम करतात. पावसाळा असो वा उन्हाळा, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित जबाबदारी पार पाडताना त्यांना प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागते. मात्र, शहराच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या भवितव्याची काळजी कोण घेणार? असा सवाल कर्मचारी प्रतिनिधींकडून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.