‘चित्रपती’ पुरस्कारांनी दिग्गजांचा सन्मान
बुधवारी रंगणार ६२वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा
मुंबई, ता. ६ : महाराष्ट्राच्या चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ९ सप्टेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात रंगणार आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आयोजनाने होणाऱ्या या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान केला जाणार आहे.
यंदाच्या सोहळ्यात ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. तसेच महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांचीही उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील म्हणाल्या, की ‘या पुरस्कारांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चित्रपट आणि सांस्कृतिक परंपरेला आकार देणाऱ्या दिग्गजांच्या योगदानाचे स्मरण केले जाते.’ तसेच नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा देण्याचे कामही या पुरस्कारांद्वारे सातत्याने होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.