सीमावीरांसाठी मुंबईतून गणरायाची स्वारी
पुंछमधील जवानांसोबत साजरा होणार गणेशोत्सव; स्वराज एक्स्प्रेसने दोन हजार किलोमीटरचा प्रवास
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) : भारत-पाकिस्तान सीमारेषेवर जम्मू-कश्मीर येथील पुंछ या गावी भारतीय जवानांकडून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील विद्याविहार येथील चित्रशाळेत दिव्यांग मूर्तिकार विक्रांत पांढरे यांनी तयार केलेली साडेसहा फूट उंचीची श्री गणेशमूर्ती रविवारी (ता. ६) जम्मू-कश्मीरकडे मोठ्या उत्साहात रवाना करण्यात आली.
मानवाधिकार कार्यकर्त्या व प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदिर, पुंछच्या ट्रस्टी ईशरदीदी यांच्या पुढाकाराने तसेच ‘प्रोग्रेसिव्ह नेशन’ संस्थेचे अध्यक्ष, स्वयंभू साल सिद्धेश्वर मंदिराचे ट्रस्टी आणि शिवनेरी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष छत्रपती आवटे यांच्या सहकार्याने हा उपक्रम गेल्या १७ वर्षांपासून अखंडपणे राबविण्यात येत आहे.
मुंबईहून स्वराज एक्स्प्रेसने सुमारे २,००० किलोमीटरचा प्रवास करून ही मूर्ती जम्मू रेल्वे स्थानकावर पोहोचेल. त्यानंतर ट्रकद्वारे सुमारे ३०० किलोमीटरचा दुर्गम व पर्वतीय मार्ग पार करीत पुंछ येथील भारत-पाकिस्तान सीमेजवळील गावात नेण्यात येणार आहे. सीमेवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अनेक आव्हानांचा सामना करीत देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानांना भक्तिभावाने हा गणेशोत्सव साजरा करता यावा, हा यामागील उद्देश असल्याचे ईशरदीदी यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात ‘एका सैनिकाची आत्मकथा’ या विषयावर चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, भारतीय सैनिकांबद्दल आदर निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना या वेळी भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली चित्रे आणि निबंध सीमावर्ती भागातील गणेशोत्सवाच्या ठिकाणी लावण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
गणेशोत्सवादरम्यान पुंछ येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. जवानांच्या उपस्थितीत श्रींची आरती केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शेरे-ए-कश्मीर पुलाजवळील पुलस्त नदीमध्ये श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.