गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त
वीज, पाणी, स्वच्छतेवर विशेष लक्ष
अलिबाग, ता. ७ (वार्ताहर) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अलिबाग पंचायत समितीतर्फे गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस सभापती भाग्यश्री पाटील, उपसभापती प्रिया भगत, गटविकास अधिकारी, गटनेते प्रकाश पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता घरत, इतर सदस्य, ग्रामसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सवापूर्वी गावातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, रस्त्यांच्या दुतर्फा स्वच्छता करावी तसेच विसर्जन घाटांची स्वच्छता करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले.
डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये आवश्यक ठिकाणी फवारणी करावी. पिण्याचे पाणी टीसीएल व ब्लिचिंग पावडरच्या माध्यमातून निर्जंतुक ठेवावे. घसरण्याची शक्यता असलेल्या रस्त्यांवर आणि धोकादायक ठिकाणी चुना टाकून सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. रस्त्यावरील दिव्यांसाठी साध्या बल्बऐवजी एलईडी दिवे वापरण्याचे निर्देश देण्यात आले. एलईडीसाठी निधीची कमतरता असल्यास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन डॉ. राऊळ यांनी दिले.
गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहावा आणि वारंवार वीजखंडित होऊ नये, यासाठी महावितरणने नियोजन करावे. तसेच पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाणीपुरवठा विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. गणेशोत्सव शांततेत, आनंदात आणि सामाजिक एकोप्याने साजरा करण्याचे आवाहन डॉ. राऊळ यांनी केले.
विसर्जन घाटांवर सुविधांचा आढावा
गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विसर्जन घाटांची स्वच्छता, सुरक्षितता आणि आवश्यक सुविधांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या. घाटांवरील परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच धोकादायक ठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देण्यात आले. गणेशोत्सव काळात सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावे, यावर बैठकीत भर देण्यात आला.