भिवंडी, ता. ७ (वार्ताहर) : शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, रविवारी (ता. ६) एकाच दिवशी कामतघर परिसरातील ब्रह्मानंदनगर येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने ३२ जणांना चावा घेतला. गेल्या चार महिन्यांत तीन हजार २९२ नागरिकांना श्वानांनी चावा घेतला असून, शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील ईदगाह, शांतीनगर, कामतघर, नदी नाका, गायत्रीनगर, निजामपुरा, कोंबडपाडा यांसह शहरातील विविध भागांत मोकाट श्वानांचे कळप रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांवर श्वानांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी कळपाने फिरणाऱ्या श्वानांमुळे पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
भिवंडी महापालिकेने ११ नोव्हेंबर २०२४ला बंद असलेले श्वान नसबंदी केंद्र पुन्हा सुरू केले. यासाठी ‘वेट्स सोसायटी फॉर ॲनिमल वेल्फेअर अँड रुरल डेव्हलपमेंट’ या संस्थेला ठेका देण्यात आला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात २४ हजारांहून अधिक मोकाट श्वान असून, त्यापैकी आठ ते नऊ हजार श्वानांची नसबंदी व लसीकरण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र शहरातील रस्त्यांवरील परिस्थिती पाहता या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पशुप्रेमींची नाराजी
शहरातील पशुप्रेमी दीप्ती देशमुख यांनी नसबंदी केंद्राच्या कामकाजाबाबत आरोप केले आहेत. नसबंदीनंतर श्वानांच्या कानावर विशिष्ट खूण केली जाते; मात्र त्याची जखम पूर्ण भरून येण्यापूर्वीच त्यांना रस्त्यावर सोडले जाते, असा आरोप त्यांनी केला आहे. परिणामी जखमांमध्ये किडे पडून काही श्वानांचा वेदनादायी मृत्यू होत असल्याचेही त्यांनी सांगितले. नसबंदी केंद्रात श्वानांना वेळेवर अन्न दिले जात नसून, शस्त्रक्रियेनंतर आवश्यक उपचार व देखभालीकडेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
श्वानांवर उपचारासाठी महापालिकेकडे कोणतीही स्वतंत्र सुविधा उपलब्ध नाही. मोकाट श्वानांची नसबंदी करून श्वानांना एका आठवड्यानंतर ज्या ठिकाणाहून आणले जाते त्या ठिकाणी सोडले जाते.
- फैसल तातली, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग
महिना श्वानदंश
एप्रिल १,०८७
मे ९०७
जून ६५६
जुलै ६४२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.