आरोग्य विभागाला घरघर!
६७६ रिक्त पदांमुळे सेवा कोलमडण्याची भीती
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर दर्जेदार इमारती उभारणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची अवस्था बिकट झाली आहे. गर्भवती महिलेचा मृत्यू, पिण्याच्या पाण्यात उंदीर सापडणे, तसेच रुग्णाला मुदतबाह्य (एक्स्पायर्ड) सलाईन देणे अशा प्रकारांमुळे आरोग्य विभागाचे वाभाडे निघत आहेत. त्यातच विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना अद्ययावत सुविधा देणे तर दूरच, नियमीत सेवा पुरवणेही पालिकेला कठीण झाले आहे.
नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला आधुनिक बनवण्यासाठी आणि नागरिकांना सर्वसमावेशक वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी महासभेत ‘एकात्मिक आरोग्य सुविधा व व्यवस्थापन धोरण-२०२६’ मंजूर केले आहे. याअंतर्गत पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मध्यवर्ती औषध भांडार उभारणे, अतिविशेष वैद्यकीय उपचार जोडणे आणि वाशी-नेरूळ-ऐरोली रुग्णालयांदरम्यान विशेष शटल सेवा सुरू करण्यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित केले आहेत, परंतु दुसरीकडे वाशी येथील मुख्य पालिका रुग्णालयातील एक हजार ८०८ मंजूर पदांपैकी तब्बल ६७६ पदे रिक्त असल्याचे भीषण वास्तव लोकप्रतिनिधींनी सभागृहात समोर आणले आहे. त्यामुळे एकीकडे भव्य धोरणांची घोषणा करायची आणि दुसरीकडे पुरेसे मनुष्यबळ नसताना प्रशासनाने सेवा कशी पुरवायची, असा कळीचा प्रश्न निर्माण झाला असून, यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय वाद पेटला आहे.
पालिका सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या या धोरणाचा मुख्य उद्देश प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते अतिविशेष रुग्णालयांपर्यंतची साखळी अधिक मजबूत करणे हा आहे. मध्यवर्ती औषध भांडार, सुपरस्पेशालिटी उपचार देणे, अद्ययावत शटल सेवा सुरू करणे, संदर्भ सेवा प्रणाली राबवणे आदी बाबी सत्ताधाऱ्यांना राबवायच्या आहेत, परंतु रिक्त पदे भरण्यावर अद्याप प्रशासनाला तोडगा काढता न आल्याने आरोग्य सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाशी रुग्णालयातील रुग्णाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला असंतोष आणि राजकीय गदारोळ शांत करायचा असेल, तर प्रशासनाला तातडीने डॉक्टर व परिचारिकांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अन्यथा, केवळ धोरणे जाहीर करून सर्वसामान्य नागरिकांना पालिका रुग्णालयांत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळणे कठीणच राहील.
६७६ रिक्त पदांचा मोठा अडथळा
शिंदे गटाचे नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी महासभेत वाशी रुग्णालयातील रिक्त पदांची आकडेवारी मांडून प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले. वाशी रुग्णालयात एकूण १,८०८ मंजूर पदांपैकी ६७६ पदे म्हणजे तब्बल ३७ टक्के पदे रिक्त आहेत. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ आणि वॉर्डबॉय यांसारख्या महत्त्वाच्या वर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासनाकडून ही रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.
प्रशासनासमोरील मुख्य आव्हाने
१ कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कार्यरत वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर २४ तास अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.
२ शहरातील २६ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर, पुरेसा औषधसाठा, ऑक्सिजन सिलिंडर आणि आपत्कालीन उपकरणांचा तीव्र तुटवडा आहे.
३ कायमस्वरूपी पदे भरली जात नसल्याने पालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे, यामुळे सेवेच्या गुणवत्तेवर आणि उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
आरोग्य विभागात अनेक ठिकाणी आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांवर वाढत्या कामाचा ताण लक्षात घेता, रिक्त पदांवर भरती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी विरोध केलेल्या भरती प्रक्रियेतील पदांना बाजूला ठेवून उर्वरीत दुसऱ्या पदे भरण्याबाबत प्रशासनाला सांगितले आहे.
- डॉ. जयाजी नाथ, आरोग्य समिती सभापती
आरोग्य विभागात रुग्णांबाबत वारंवार होणारी हेळसांड आणि दुर्लक्षामुळे घडणाऱ्या घटनांवर आळा आणण्यासाठी लवकरच एक मानक कार्यपद्धती तयार केली जात आहे. येत्या दोन आठवड्यांत ही पद्धत तयार केल्यानंतर रुग्णांसोबत होणारे अपघात टळतील, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. राजेश म्हात्रे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.