‘सायकल बँक’ ठरतेय
नव्या क्रांतीचे प्रतीक
कुडाळ हायस्कूलमध्ये १०० गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : दुर्गम व ग्रामीण भागातील लालमातीच्या रस्त्यांवरून दररोज तीन-चार किलोमीटरची पायपीट करत शाळेची पायरी गाठणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता ‘पेडल’ची जोड मिळाली आहे. नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर पाटकर आणि उपजिल्हाप्रमुख महेश परब यांच्या दातृत्वातून कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या १०० गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले.
कुडाळ हायस्कूलच्या शिक्षण संस्थेने मांडलेली ‘सायकल बँक’ ही अभिनव संकल्पना या सोहळ्यात सर्वात लक्षवेधी ठरली. संस्थेचे सहकार्यवाह अनंत वैद्य यांनी प्रास्ताविकातून ही संकल्पना स्पष्ट केली. या योजनेअंतर्गत सायकल मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती सायकल सुस्थितीत शाळेकडे जमा करायची आहे. त्यानंतर हीच सायकल पुढील वर्षी येणाऱ्या नव्या गरजू विद्यार्थ्याला वापरण्यास देण्यात येणार आहे. सायकलींच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च संस्थाचालक व दानशूर मंडळी स्वतः उचलणार आहेत. अनेक पिढ्यांना शिक्षणाची वाट सोपी करून देणारी ही ‘सायकल बँक’ संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी संस्थाचालकांच्या या दूरदृष्टीचे भरभरून कौतुक केले.
सर्व जण सहसा वही-पेन, छत्र्या किंवा रेनकोट वाटतात; पण मुलांची अडचण ओळखून एवढ्या मोठ्या संख्येने सायकली देण्याची तयारी दाखवणे ही मोठी गोष्ट आहे. किशोर पाटकर यांनी स्वतः कर्ज काढून या भागातील तब्बल १२ ते १४ शाळांमधील १५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. हजारो सायकली देऊनही कुठल्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, व्यासपीठावर स्वतः न येता काम करणाऱ्या या व्यक्तीचे दातृत्व खरोखरच कौतुकास्पद आहे, असे सामंत यांनी सांगितले. स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार नारायण राणे आणि आमदार नीलेश राणे यांच्या माध्यमातून परिसरात होत असलेल्या विकासकामांचा आणि शैक्षणिक प्रगतीचाही त्यांनी गौरव केला. कमशीप मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याची सुरुवात एनसीसी कॅडेट्सच्या शानदार सलामीने झाली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते आणि अनंत वैद्य यांच्या दोन वर्षांच्या निरंतर पाठपुराव्यातून या सायकली प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विनायक राणे, काका कुडाळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक, नगरसेवक अभि गावडे, विलास कुडाळकर, ॲड. राजीव कुडाळकर, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------------------------
पायपीट थांबली; चेहऱ्यावर समाधान
उन्हातानात आणि पावसाच्या दिवसांत दररोज तीन ते चार किलोमीटरची रपेट मारून थकणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर सायकल हातात पडताच एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. ‘‘घरून शाळेत येताना खूप त्रास व्हायचा, अनेकदा वाहने न मिळाल्यास वेळेवर पोहोचणे कठीण जायचे. आता सायकल मिळाल्यामुळे वेळेची बचत होईल आणि पायांची पायपीट थांबेल,’’ अशी प्रातिनिधिक भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.