अधिकाऱ्यांचे आजपासून
‘चला शाळेत जाऊया’ अभियान
भौतिक सुविधांसह शाळेची तपासणी करणार
मुंबई, ता. ७ : राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जपणूक करण्यासाठी राज्यभरात ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबवले जाणार आहे. त्यानुसार मंगळवारी (ता. ८) शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन अभियानात सहभागी होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली.
‘चला शाळेत जाऊया’ अभियानादरम्यान शिक्षण विभागातील अधिकारी ८ व ९ सप्टेंबर, २२ व २३ सप्टेंबर आणि ७ व ८ ऑक्टोबरला संबंधित जिल्ह्यातील शाळांना भेटी देतील. त्यांच्या भेटीचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाचे अध्यक्ष हे संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील. ते दर १५ दिवसांनी कामांचा आढावा घेऊन शिक्षण आयुक्तालयास अहवाल सादर करतील, अशी माहितीही मंत्री भुसे यांनी दिली. गुणवत्तापूर्ण शिक्षण हा विभागाचा केंद्रबिंदू असून, विद्यार्थ्यांची वाचन, लेखन आणि आकलन क्षमता वाढविणे, मराठी शाळांबाबत समाजाचा विश्वास दृढ करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गुणवत्तेची नवी उंची गाठणे यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
---
आदर्श उपक्रमांचा राज्यभर प्रसार
राज्यातील अनेक शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समित्या समाजाच्या सहभागातून उल्लेखनीय काम करीत आहेत. काही शाळांनी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि उद्योग समूहांच्या सीएसआर निधीच्या मदतीने शाळांचा कायापालट केला आहे. अशा आदर्श उपक्रमांचा राज्यभर प्रसार करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री भुसे म्हणाले. रखडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीबाबत पुढील काही दिवसांत माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---
दुसऱ्या गणवेशासाठी निधी
राज्यातील सरकारी शाळांमध्ये दुसरा गणवेशही उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समित्यांना निधी वितरित करण्यात आला. तसेच शाळा सुधारणेसाठी यापुढे जिल्हा नियोजन समितीतील निधी खर्च केला जाणार असल्याने शाळांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.