भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : सुताच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीचा फटका भिवंडीतील वस्त्रोद्योगाला बसू लागला आहे. सट्टेबाजीमुळे अवघ्या दोन महिन्यांत सुताच्या किमतीत सुमारे ३५ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा यंत्रमागधारकांनी केला आहे. परिणामी कापडाच्या खरेदी-विक्रीत घट झाली असून उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कापड विकावे लागत असल्याने यंत्रमागधारक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
भिवंडीत सहा लाखांहून अधिक यंत्रमाग असून साडेतीन लाखांपेक्षा जास्त कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत. शहरातील अनेक लघुउद्योगही यंत्रमाग व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यामुळे सुताच्या दरवाढीचा थेट परिणाम संपूर्ण वस्त्रोद्योगावर होत आहे. लक्ष्मीनारायण ट्रेडर्सचे मालक कौशल झा यांनी सांगितले की, पूर्वी २१० रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा धागा आता २७० रुपयांवर पोहोचला आहे. ६०/६० कार्डेड धाग्याची पाच किलोची किंमत १,०५० रुपयांवरून १,३५० रुपये, तर ६० कॉम्बेड धाग्याची किंमत १,२५० रुपयांवरून १,५०० रुपये झाली आहे. ४० कार्डेड धाग्याचा दरही १९० रुपयांवरून २२० रुपये प्रतिकिलो झाला आहे. आर. के. टेक्सटाइल्सचे मालक राकेश केसरवानी यांनी सांगितले की, सुताच्या किमतीत वाढ झाल्याने कापड उत्पादनाचा खर्च वाढला आहे; मात्र कापडाचे विक्रीदर वाढलेले नाहीत.
कारखाने बंद होण्याची भीती
ए. ए. यार्नचे मालक श्रीनिवास वल्लाल आणि दीपक सरावागी यांनी सांगितले की, सुताच्या दरवाढीमुळे कापड उत्पादनाचा खर्च २६ रुपये प्रतिमीटर झाला असून कापड मात्र २४ रुपये प्रतिमीटर दराने विकावे लागत आहे. व्यापारी वाढीव दर देण्यास तयार नसल्याने यंत्रमागधारकांना तोटा सहन करावा लागत आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास कारखाने बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
यार्न बँक स्थापन करण्याची मागणी
पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सरकारकडे यार्न बँक स्थापन करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे भिवंडी शहर अध्यक्ष अब्दुल गनी खान यांनी सुताच्या दरवाढीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले. सुताचा सट्टेबाजार रोखण्यासाठी यार्न बँक स्थापन करून सुताच्या किमती निश्चित कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.