गणरायाच्या अलंकारांना वाढती मागणी
सोने-चांदीसह ‘गोल्ड प्लेटेड’ दागिन्यांनी बाजारपेठ सजली
वाशी, ता. ८ (बातमीदार) ः गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून, शहरात लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठा पूर्णपणे सजल्या आहेत. घरातील असो वा सार्वजनिक मंडळातील, गणेशमूर्तीचे सौंदर्य खुलवण्यासाठी दागिन्यांना विशेष पसंती दिली जाते. यंदा बाजारात सोने-चांदीच्या दागिन्यांसोबतच गोल्ड प्लेटेड दागिने आणि पारंपरिक नक्षीकामाच्या वस्तूंना मोठी मागणी आहे.
लाडक्या गणरायाला सोन्याच्या दागिन्यांनी सजविण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची लगबग वाढली आहे. भाविकांना मनाजोगे दागिने उपलब्ध व्हावेत याकरिता सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे. दिवसेंदिवस सोने-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे दागिने खरेदीचा जोर तसा कमी झाल्याने हुबेहूब सोन्यासारखे दिसणाऱ्या दागिन्यांचा ट्रेंड वाढला आहे. मूर्ती सजविण्यासाठी मोत्यांची माळ, डायमंड ज्वेलरी तसेच इकोफ्रेंडली बाप्पासाठी कागदापासून तयार केलेले दागिने, फुलांपासून तयार केलेल्या माळांचा वापर केला जात आहे.
चांदीच्या दागिन्यांना मंडळांची मागणी
गणरायाची मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी सजविण्यास मंडळांचे अधिक प्राधान्य दिसून येत आहे. चांदीचा पत्रा तयार करून मूर्तीच्या मापानुसार संबंधित दागिन्याचे कच्चे नक्षीकाम करण्यात येते. पेन्सिलने तयार केलेले हे नक्षीकाम चांदीच्या पत्र्यावर चिटकविले जाते. लाख, खिळे आणि हातोडी यांच्या साह्याने अंतिम नक्षीकाम तयार केले जात असल्याची माहिती व्यापारी दिनेश मेहता यांनी दिली.
दागिन्यांचे प्रकार
विविध ज्वेलर्स ब्रॅण्डने बाप्पाचे उपरणे, गोल्ड प्लेटेड मोदक कंठी, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादी प्रकारातला चांदीचा ड्रायफ्रूट सेट, गोल्ड प्लेटेड पाच फळे, उंदीर आदी प्रकारचे दागिने आपल्याला पाहायला मिळतील. मुकूट, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगण, कुंडल, दुर्वांचा हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जाणवं, बाजुबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टँड, फुलपरडी, नंदादीप आदींना वाढती मागणी आहे.
सोन्याचे पाणी वापरणाऱ्या वस्तूंसाठी एक ग्रॅमची ४०० रुपये किंमत आहे. वस्तूच्या आकारानुसार त्यांची साईज ठरते व त्यानुसार दर ठरतात. चांदीच्या व सोन्यांचा मुलामा दिलेल्या वस्तूंना चांगली मागणी आहे. आता त्यामध्ये विविध प्रकारदेखील येऊ लागले आहे.
- मोतीसिंह, व्यापारी
गणारायाला सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तूंनी सजवताना जरा वेगळेपण वाटते. खोटी विभूषणे घालण्यापेक्षा सोन्याची घालताना वेगळा आनंद वाटतो. एकदा सोन्याची मुलामा दिलेली दागिने वापरल्यानंतरदेखील ती सांभाळून ठेवण्यात येतात. दरवर्षी एक नवीन दागिना घेण्यात येतो.
- सुनंदा मोकाशी, नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.