बाप्पाची सजावट ‘कृत्रिम’ फुलांनी बहरली!
नैसर्गिक फुलांच्या तुलनेत स्वस्त असल्याने बाजारात मागणी वाढली
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या सजावटीसाठी यंदा कृत्रिम फुलांना ग्राहकांची वाढती पसंती मिळत आहे. स्वस्त, टिकाऊ आणि पुन्हा वापरता येत असल्याने नैसर्गिक फुलांच्या तुलनेत कृत्रिम फुलांकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.
राज्यात विशेषतः मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत घरे, इमारती, कार्यालये तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आकर्षक सजावटीला विशेष महत्त्व दिले जाते; मात्र नैसर्गिक फुले महाग आणि नाशवंत असल्याने त्यांची वारंवार खरेदी करावी लागते. त्याउलट कृत्रिम फुलांचा पुढील वर्षी तसेच दिवाळी, नवरात्र यांसारख्या अन्य सणांमध्येही वापर करता येतो. त्यामुळे एकदाच केलेला खर्च अनेक वर्षे उपयोगी पडत असल्याने ग्राहक कृत्रिम फुलांना पसंती देत आहेत.
सध्या बाजारात नैसर्गिक फुलांसारखी हुबेहूब दिसणारी गुलाब, डच गुलाब, मोगरा, जास्वंद, शेवंती, झेंडू, गुलछडी, ॲस्टर, जर्बेरा आणि ऑर्किड यांसह विविध प्रकारची हिरवी पाने, गजरे, वेण्या, हार आणि तोरणे उपलब्ध आहेत. या आकर्षक फुलांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बाप्पाच्या मूर्तीभोवती, मखराच्या बाजूला, पाठीमागील पडद्यावर तसेच घराच्या प्रवेशद्वारावर सजावट करण्यासाठी घरगुती गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडूनही कृत्रिम फुले, हार आणि तोरणांची खरेदी केली जात आहे. दादरच्या फूल बाजारात गणेश चतुर्थीनिमित्त नैसर्गिक फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असली तरी प्लॅस्टिकच्या झेंडूच्या माळांसह विविध प्रकारची कृत्रिम फुले, हार आणि तोरणेही मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत. त्यामुळे कृत्रिम फुलांच्या विक्रीमुळे विक्रेत्यांमध्ये यंदा चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.
नैसर्गिक फुलांपेक्षा प्लॅस्टिकची फुले स्वस्त आणि टिकाऊ असल्याने अनेक वर्षे वापरता येतात. त्यामुळे सजावटीसाठी मी प्लॅस्टिकची फुले खरेदी करतो; पूजेसाठी मात्र खरी फुलेच घेतो.
- संदीप चव्हाण, ग्राहक
यंदा प्लॅस्टिकची फुले, तोरणे आणि इतर सजावटीच्या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात खप होत आहे. ग्राहकांकडून विविध प्रकारच्या कृत्रिम फुलांना चांगली मागणी आहे.
- धनेश मिश्रा, विक्रेते दादर
कृत्रिम फुलांचे भाव
- फुलाच्या रंगेबेरंगी मालाची
जोडी- ३०० रुपये
- गुलाब हार जोडी ३०० रुपये
- मोगरा जोडी ३०० रुपये
- जास्वंदी फुले १०० ते २५० रुपये
- गोंडा हार जोडी १०० ते १५० रुपये
- गोंडे पाच फूट २०० रुपये
- गुलाब नग एकूण १५० ते १,८०० रुपये
- विविध सुटी फुले १५० ते २०० रुपये
- सूर्यफूल सहा फूट २,५०० रुपये
- हिरवी पाने तीन डझन १५० रुपये
- जिप्सी १०० रुपये
- ऑर्केड ४ नग १०० रुपये
- हार १०० रुपये
- तोरण पाच फूट ५०० रुपये
- कागदी फुले १५ ते ३० रुपये
- गणपती मखर - १,५०० ते ६,००० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.