प्रवाशाची विसरलेली बॅग सुखरूप परत
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
जुईनगर, ता. ८ (बातमीदार) : प्रवासादरम्यान रिक्षामध्ये विसरलेली बॅग एका प्रामाणिक रिक्षाचालकाने रिक्षा युनियनच्या कार्यालयात जमा केल्याने प्रवाशाला तिचे सामान सुखरूप परत मिळाले. रिक्षाचालकाच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत असून, रिक्षाचालक-मालक सेवाभावी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचेही यानिमित्ताने सर्वत्र कौतुक केले जात आहे.
सानपाडा येथील प्रवासी आरती केदार या प्रवासादरम्यान रिक्षामध्ये आपली बॅग विसरून गेल्या होत्या. घरी पोहोचल्यानंतर बॅग सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सकाळी रिक्षा युनियनच्या कार्यालयाशी संपर्क साधून बॅग हरवल्याची माहिती दिली.
दरम्यान, एका प्रामाणिक रिक्षाचालकाला रिक्षामध्ये बॅग आढळून आली होती. त्याने ती स्वतःकडे न ठेवता तत्काळ रिक्षा युनियनच्या कार्यालयात जमा केली. बॅगच्या मालकाचा शोध घेण्यासाठी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आरती केदार यांच्याशी संपर्क साधला. तसेच बॅगचा फोटो त्यांना पाठवून तिची खात्री करण्यात आली. फोटो पाहताच केदार यांनी ती आपलीच बॅग असल्याचे ओळखले.
त्यानंतर रिक्षाचालक राजू कांबळे यांच्या माध्यमातून बॅग जशीच्या तशी आरती केदार यांचे पती रवी केदार यांना परत करण्यात आली. आपली हरवलेली बॅग कोणतीही वस्तू कमी न होता सुखरूप परत मिळाल्याने केदार यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी रिक्षाचालक राजू कांबळे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून रिक्षाचालक-मालक सेवाभावी संस्थेचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.