‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’चा जागर
पनवेल ग्रामीण प्रकल्पात ९ सप्टेंबरपासून राष्ट्रीय पोषण महिना; विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन
पनवेल, ता. ८ (बातमीदार) ः ‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’अंतर्गत वैयक्तिक स्वच्छता, सकस आहार आणि पोषणाबाबत समुदाय स्तरावर जनजागृती निर्माण करण्यासाठी पनवेल ग्रामीण प्रकल्पात नववा राष्ट्रीय पोषण महिना राबविण्यात येणार आहे. हे अभियान ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या काळात चालणार असून, यादरम्यान तालुक्यात विविध जनजागृती व पोषणविषयक उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ ९ सप्टेंबर रोजी रुद्राक्ष कॉन्व्हेन्शन सेंटर, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे केंद्रीय महिला व बालविकासमंत्री अन्नपूर्णा देवी आणि महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावर्षीच्या पोषण महिन्याची मध्यवर्ती संकल्पना ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ अशी निश्चित करण्यात आली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रे, बालकांचे पोषण, माता व गरोदर महिलांचे आरोग्य तसेच बालविकास याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे. दरम्यान, पनवेल प्रकल्पाला जिल्ह्यात अव्वल ठेवण्यासाठी तसेच बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी नागरिक, माता-भगिनी आणि स्थानिक समुदायाने अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण विकास अधिकारी प्रवीण पाटील यांनी केले आहे.
पाच प्रमुख सूत्रांवर आधारित उपक्रम
आहारातील विविधता व प्रथिनांचा समावेश : बालकांच्या आहारात विविध अन्नघटक आणि पुरेशा प्रथिनांचा समावेश करणे.
पौष्टिक आहार : अंगणवाडी केंद्रात स्वच्छ, ताजा व गरम शिजवलेला आहार देणे.
स्थानिक समुदायाचा सहभाग : अंगणवाडी केंद्रांच्या विकासात स्थानिक समुदायाची मालकी व जबाबदारी वाढवणे.
बालकल्याणकारी उद्दीपन : खेळातून शिक्षण आणि बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासावर भर देणे.
मातृवंदन योजना : प्रधानमंत्री मातृ वंदन योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ माता व गरोदर महिलांपर्यंत पोहोचवणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.