रुग्णालयातील राड्याने सरकारची कोंडी
पोलिस अधीक्षकांना हजर राहण्याचे आदेश
पालघर डॉक्टर मारहाण प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : पालघर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या गोविंदा पथकातील सहकाऱ्यांच्या नातेवाइकांकडून उपचारादरम्यान तपासणीचे पैसे मागितल्याने शिवसैनिकांनी (शिंदे गट) रुग्णालयात शिवीगाळ करत धुडगूस घातला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. ८) गंभीर दखल घेतली आणि पालघर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकांना बुधवारी (ता. ९) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.
डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रेंकडून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेची न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली होती. याची आठवण न्यायालयीन मित्र म्हणून उपस्थित असलेल्या निरंजन मुंदरगी यांनी दिली. त्याच घटनेची पालघरमध्येही पुनरावृत्ती झाल्याचे न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाला सांगितले. त्याच वेळी डॉक्टरांना संरक्षण देण्याऐवजी त्यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचा स्थानिक पोलिसांवर दबाव आणण्यात येत असल्याचेही मुंदरगी यांनी सांगितले. ही फार दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हणजे हे प्रकरण डोंबिवलीतील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीसारखेच आहे, असे निरीक्षण न्या. गडकरी यांनी नोंदवले आणि राज्य सरकारने काय पावले उचलली, अशी विचारणा केली. त्यावर कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तुम्हाला याप्रकरणी काल नोटीस मिळाली होती. आज हे प्रकरण दुपारी सुनावणीसाठी आले, तरीही राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्यासाठी वाढीव वेळ कशासाठी हवा, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आणि पोलिस अधीक्षकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले.
घरतच्या पोलिस कोठडीत वाढ
पालघर : डॉक्टरांना मारहाणप्रकरणी शिवसेनेच्या सात पदाधिकाऱ्यांसह १७ जणांविरोधात रविवारी पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये शिवसेना पालघर शहरप्रमुख राहुल घरत, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, उपतालुकाप्रमुख मनीष ऊर्फ विकी संखे, युवासेना जिल्हाप्रमुख साईराज पाटील, आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावित, उपतालुकाप्रमुख राहुल संखे आणि युवासेना विधानसभा प्रमुख ऋषभ वारे यांचा समावेश आहे. घरत यांनी सोमवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. मंगळवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत दोन दिवसांची वाढ करण्यात आली.
पक्षातून निलंबनाचे आदेश
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी मंगळवारी आरोपी राहुल घरत यांच्यासह इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश जारी केले. पक्षाची शिस्त आणि जबाबदारीचे भान न राखल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, पालघर डॉक्टर्स असोसिएशनने याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. डॉक्टरांना मारहाण आणि धमकावल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.