मुंबई

अंगणवाडी आता गावाचीच जबाबदारी!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : बालकांच्या ताटात सकस आहार, मातांच्या आरोग्याची काळजी आणि कुपोषणाला आळा घालण्यासाठी आता अंगणवाडी केंद्रांभोवती केवळ शासकीय यंत्रणा नव्हे, तर संपूर्ण गावाला जोडण्याचा प्रयत्न ठाणे जिल्ह्यात केला जाणार आहे. ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ या संकल्पनेतून ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिना राबवणार आहे. या महिनाभरात गावागावांत पोषण मेळावे, सकस आहाराच्या पाककृतींची प्रात्यक्षिके, ‘प्रथिनयुक्त ताट’ स्पर्धा, पोषणवाटिका प्रदर्शन आणि पालक संवादातून पोषणाचा संदेश दिला जाणार आहे.
महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने होणाऱ्या नवव्या राष्ट्रीय पोषण महिन्याची सुरुवात ९ सप्टेंबरला वाराणसी येथे होणार आहे. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात ग्रामीण आणि नागरी भागात अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण विभागाने यासाठी नियोजन केले आहे. कुपोषणाविरोधातील लढाईत आहारातील विविधता आणि प्रथिनयुक्त पदार्थांचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यावर यंदा विशेष भर राहणार आहे. धान्य, कडधान्ये, भाज्या, फळे; तसेच वनस्पती आणि प्राणिजन्य प्रथिनांचा योग्य वापर करून संतुलित आहार कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक अंगणवाडी केंद्रांवर दिले जाणार आहे. ‘प्रथिनयुक्त ताट’ स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक आणि सहज उपलब्ध पदार्थांपासून सकस आहार तयार करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. अंगणवाडीतील बालकांना ताजे आणि गरम शिजवलेले पूरक पोषण आहार मिळतो का, आहारात पुरेशी विविधता आहे का आणि अन्न तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले जाते का, यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
..........................
पालकांनाही सहभागी करणार
बालकांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी प्रारंभिक बाल संगोपन व शिक्षणाचे महत्त्व पालकांना पटवून दिले जाणार आहे. बालकांच्या विकासातील विविध टप्प्यांचे परीक्षण, योग्य संगोपन आणि आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शन केले. अंगणवाडी व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेऊन स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे अंगणवाडी ही केवळ सरकारी केंद्र न राहता गावातील बालकांच्या भवितव्याशी जोडलेले सामुदायिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

मातांच्या आरोग्यावरही भर
गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या पोषण व आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका, मदतनीस, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. गर्भवती महिला, स्तनदा माता, बालके आणि किशोरवयीन मुला-मुलींपर्यंत पोषणविषयक माहिती पोहोचविण्यावर भर राहणार आहे.
..................................

कुपोषणमुक्त आणि निरोगी समाज निर्माण करणे ही केवळ एका विभागाची जबाबदारी नाही. अंगणवाडी सक्षम करण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग आवश्यक आहे. पोषणविषयक योग्य सवयी बालपणापासून लागल्यास पुढील पिढी अधिक सक्षम आणि निरोगी घडेल. त्यामुळे नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा.
- रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद

Ratnagiri Road Project : रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! मिरजोळे एमआयडीसीच्या मुख्य रस्त्याचे 24 कोटींतून होणार चौपदरीकरण; असा असणार नवा लूक

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT