सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारणाऱ्या ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर तीन महत्त्वाचे निर्णय मिळाले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना घर, पात्र कर्मचाऱ्यांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजनेचा आर्थिक लाभ आणि लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या निर्णयांची परिपत्रकेही जारी झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठाणे महापालिका कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी; तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार संजय केळकर यांनी १० ऑगस्टला महापालिका मुख्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली होती. कर्मचाऱ्यांच्या दहा प्रमुख प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर प्रशासनाने तीन प्रश्नांना प्राधान्य देत त्यावरील कार्यवाहीला सुरुवात केली. पात्र कर्मचाऱ्यांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा निर्णय झाला. या योजनेनुसार पात्र कर्मचाऱ्यांना मिळणारा आर्थिक लाभ तातडीने देण्यासाठी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच पालिकेतील पात्र लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लिपिकांना आता दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, बैठकीत चर्चिलेले उर्वरित सात प्रश्न अद्याप प्रलंबित असून, तेही मार्गी लागावेत यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. तीन महत्त्वाच्या मागण्यांवर तत्काळ निर्णय झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
...............................
गृहसंकुलाच्या प्रक्रियेला सुरुवात
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत गृहसंकुल उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेलाही प्रशासनाने सुरुवात केली आहे. पात्र कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.