सुरक्षेच्या नावाखाली वृक्षांची अशास्त्रीय कत्तल थांबवा
तीन महिन्यांतील वृक्ष छाटणीचे शास्त्रीय ऑडिट करण्याची मागणी
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) ः शहरात नागरिकांच्या सुरक्षेच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी छाटणी वादात सापडली आहे. धोकादायक व सुकलेल्या फांद्या काढण्याऐवजी अनेक ठिकाणी हिरव्या आणि मोठ्या फांद्यांचीही छाटणी केली जात असल्याचा दावा सजग नागरिक मंचाने केला आहे. गेल्या तीन महिन्यांत झालेल्या वृक्ष छाटणीचे पाच स्वतंत्र व पात्र वृक्षतज्ज्ञांकडून शास्त्रीय ऑडिट करावे, अशी मागणी मंचाने पालिकेच्या उद्यान विभागाकडे केली आहे.
महाराष्ट्रातील वृक्ष संरक्षण कायद्यानुसार वृक्ष प्राधिकरणावर संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ सुरक्षेच्या कारणास्तव छाटणी एवढे कारण पुरेसे नसून ती शास्त्रीय पद्धतीने झाली का, याची तपासणी आवश्यक असल्याचे मंचाचे म्हणणे आहे. पिंपळ, वड यांसारख्या देशी वृक्षांनाही मोठ्या प्रमाणावर बोडके केले जात असल्याबद्दल मंचाने नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक झाडाची छाटणी का करण्यात आली, किती फांद्या कापण्यात आल्या, झाडाच्या छत्रीचा किती भाग कमी झाला आणि त्याचा झाडाच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचा अहवाल तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अयोग्य छाटणी आढळल्यास अधिकारी, कर्मचारी किंवा कंत्राटदाराची जबाबदारी निश्चित करावी, असेही मंचाने म्हटले आहे.
डिजिटल नोंद ठेवा
भविष्यात छाटणीपूर्वी व छाटणीनंतरचे छायाचित्र, झाडाची प्रजाती, क्रमांक, ठिकाण, छाटणीचे कारण व प्रमाण यांची डिजिटल नोंद ठेवावी. तसेच कामाचे आदेश, निविदा अटी, तांत्रिक तपशील, स्थळ सूचना, मोजमाप नोंदवही आणि देयकांचीही पडताळणी करावी, अशी मागणी मंचाने केली आहे.
वृक्ष छाटणी ही केवळ फांद्या कापण्याची प्रक्रिया नसून झाडाच्या संपूर्ण संरचनेचा आणि भविष्यातील आरोग्याचा विचार करून केली जाणारी शास्त्रीय प्रक्रिया आहे. धोकादायक फांद्या काढणे आणि झाडाच्या नैसर्गिक छत्रीचा मोठा भाग काढणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक झाडाची स्वतंत्र तपासणी करून आवश्यक तेवढीच छाटणी केली पाहिजे.
- विजयकुमार कट्टी, वृक्षतज्ज्ञ, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.