नवी मुंबईच्या विकासासाठी आमदार मंदा म्हात्रे यांची २४ कोटींच्या निधीची मागणी
क्रीडा, आरोग्य अन् पर्यटनाला मिळणार गती
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ९ : शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्य सरकारकडे २४ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. या निधीतून बेलापूर व दिवाळे परिसरात अत्याधुनिक क्रीडा संकुल, बटरफ्लाय पार्क, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाची कामे प्रस्तावित आहेत.
बेलापूर गावातील पालिका पर्यावरण प्रयोगशाळेमागील मोकळ्या भूखंडावर स्थानिक युवक व खेळाडूंसाठी सर्व सुविधायुक्त २० कोटींचे क्रीडा संकुल उभारले जाणार आहे. नगरविकास विभागामार्फत या प्रस्तावाला मंजुरी मागण्यात आली असून, यामुळे स्थानिक खेळाडूंना ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा व सरावासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. बेलापूर विभागातील सारसोल जंक्शन, पाम बीच मार्गालगतच्या भूखंडावर फुलपाखरू उद्यान विकसित केले जाईल. पर्यटन विभागामार्फत निधीची मागणी करण्यात आली असून, यामुळे पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. दिवाळे गावाचा स्मार्ट व्हिलेज धर्तीवर विकास करण्यासाठी तेथे १० खाटांचे अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना प्राथमिक उपचार सहज उपलब्ध होतील. स्मशानभूमी अद्ययावतीकरण व सुशोभीकरण निधी एक कोटींच्या निधीची मागणी केली आहे. बेलापूर गावातील स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ, सुसज्ज आणि मूलभूत सुविधांनी युक्त करण्यासाठी सुशोभीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून बेलापूर व दिवाळे गावातील क्रीडा, आरोग्य, पर्यावरण, पर्यटन आणि पायाभूत नागरी सुविधांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
बेलापूर मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य, अत्याधुनिक क्रीडा सुविधा, पर्यावरणपूरक पर्यटन आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही माझी प्रमुख प्राथमिकता आहे. या प्रस्तावांना शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर परिसराच्या विकासाला मोठा वेग मिळेल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर विधानसभा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.